Aurangabad
Aurangabad Tendernama
मराठवाडा

Aurangabad : अखेर दहा वर्षांनंतर 'या' पुलाचे उजळले भाग्य

संजय चिंचोले

औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबाद ते चिकलठाणा रेल्वेस्टेशन या मार्गावरील लोहमार्गावर शहानुरवाडी येथील गेट क्रमांक ५४ येथील उड्डाणपुलावर तसेच पुलाखालच्या  रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. या खड्ड्यांमुळे रस्त्याची मोठी दुरवस्था झाली होती. या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली होती. याबाबत ‘टेंडरनामा’नेही अनेक वेळा वृत्त प्रकाशित केले होते.

या वृत्ताची दखल घेऊन मनपाने तातडीने रस्त्याचे काम सुरू केले आहे. एवढेच नव्हेतर तब्बल दहा वर्षांनंतर पुलाची रंगरंगोटी आणि सुशोभिकरणाचे काम देखील हाती घेण्यात आल्याने पुलाला नवा लुक येत आहे. दहा वर्षापूर्वी सरकारीअनुदानातून २७ कोटी ६४ लाख रूपये खर्च करून येथे दोन किलोमीटर लांबीचा पूल बांधण्यात आला होता. पुलाच्या बांधकामासाठी पुण्याच्या मनोजा स्थापत्य इंजिनिअरींग या कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली होती.  एमएसआरडीसीच्या निगराणीत पुलाचे काम करण्यात आले होते. मात्र पाच वर्षांचा दोष निवारण कालावधी आटोपल्यानंतर कंत्राटदाराने पुलाच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले.

पुलाचे बांधकाम झाल्यावर देखभाल दुरूस्तीचा कालावधी संपल्यानंतर पुल पुढील देखभाल दुरूस्तीसाठी मनपाकडे हस्तांतरीत केल्याचे सांगत एमएसआरडीसीचे अधिकारी मनपाकडे बोट दाखवत होते. मात्र हस्तांतरणापूर्वी पुल सुस्थितीत करून न दिल्याने जबाबदारी त्यांचीच असल्याचे मनपाचे अधिकारी सांगत होते. दोघांच्या वादात खड्ड्यांंमुळे रस्त्यावरून वाहन चालविणेही अवघड झाले होते. खड्ड्यांमुळे रस्त्यावर दररोज लहान-मोठे अपघात घडत असत. आहेत. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी देवानगरी तसेच शहानुरवाडी येथील नागरिकांनी मनपातील प्रभाग अभियंत्यापासून प्रशासकांपर्यंत  केली होती; परंतु संबंधित विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले गेले.

याबाबत ‘टेंडरनामा’ने वेळोवेळी वृत्त प्रकाशित केले होते. एवढेच नव्हेतर सातत्याने पाठपुरावा करत मनपा प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले होते. या वृत्ताची दखल घेऊन मनपाच्या बांधकाम विभागाने दोन किलोमीटरच्या रस्त्याचे काम हाती घेतले आहे. सध्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असून, या भागातील नागरिकांनी  समाधान व्यक्त केले आहे. सदर रस्त्याच्या कामासाठी २५ लाखाहून अधिक खर्च मनपाच्या तिजोरीतून केले जात आहेत. औरंगाबादेतील अमन कंन्सट्रक्शन कंपनीला रस्ता दुरूस्तीचे काम देण्यात आले आहे. रस्त्याचे काम चालु केल्यामुळे मनपा प्रशासक डाॅ. अभिजित चौधरी, शहर अभियंता ए. बी. देशमुख, कार्यकारी अभियंता भागवत फड व प्रभाग अभियंता राजेंद्र वाघमारे, हेमंत फालक यांचे येथील रहिवाशी आभार मानत आहेत.