Aurangabad
Aurangabad Tendernama
मराठवाडा

Aurangabad : 40 वर्षांनंतर 'या' मार्गावर खड्डे, कोंडीतून मुक्ती

संजय चिंचोले

औरंगाबाद (Aurangabad) : जुन्या शहरातील किलेअर्क-व्हिआयपी रोड-नौबत दरवाजा ते पंचकुआ पुलापर्यंत रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे व पंचकुआ कब्रस्तानला लागून असलेल्या नाल्याची संरक्षित भिंत बांधणे बाबत शुक्रवारी महापालिकेच्या शहर अभियंता कार्यालयामार्फत टेंडर काढण्यात आले. याकामासाठी २ कोटी ४९ लाख १३ हजार २६ रूपये टेंडर रक्कम नमुद करण्यात आली आहे. लवकरच या कामाला सुरूवात झाली, तर तब्बल ४० वर्षानंतर औरंगाबादकरांची या मार्गातील खड्डे आणि कोंडीतून मुक्तता होईल.

या रस्ता बांधण्याआधी महापालिका प्रशासनाच्यावतीने २१ जानेवारी २०२२ अर्थात १२ महिन्यांपूर्वी रूंदीकरण मोहिमेस सुरुवात करण्यात आली होती. यासाठी अनेक घरांची अतिक्रमणे काढून येथील शंभर फुटी रस्ता मोकळा करण्यात आला होता. अतिक्रमणधारकांना आमखास मैदानामागे किंवा स्मार्ट सिटी कार्यालयाच्या माघे भुखंड देऊन त्यावर घरे बांधून देण्याचे आश्वासन महापालिकेने दिले होते. आता रस्त्याचे काम चालु झाल्यावर येथील अतिक्रमणधारकांना दिलेल्या आश्वासनाची पुर्तता महापालिका करणार काय, आता हात वर केले तर लोक रस्त्याचे काम होऊ देतील काय, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

यापुर्वी सदर रस्त्यासाठी सरकारच्या १५० कोटीच्या प्रकल्पातून ३ कोटी १७ लाख ९७१ रूपये मंजूर करण्यात आले होते. २३ ऑक्टोबर २०२० रोजी याकामाचे कंत्राट राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले होते. मात्र, दक्षिणेकडून सिटीचौक ते पंचकुआ कब्रस्तानापर्यंत कंत्राटदाराने काम केले. पुढे निधीची कमतरता आणि अतिक्रमणाचा विळखा असल्याने पंचकुआ कब्रस्थान ते नौबत दरवाचा किलेअर्क व्हीआयपी रस्त्याचे काम  गेल्या अनेक महिन्यांपासून रखडले होते.

किलेअर्क-व्हीआयपी रोड-नौबत दरवाजा-पंचकुआ हा सिटीचौक मुख्य बाजारपेठेत जाण्यासाठी नागरिकांना एकमेव मुख्य रस्ता आहे. याच मार्गावरील नौबत दरवाजात चारशे वर्षांपूर्वी खास व्यक्तींचे नौबती वाजवून स्वागत केले जायचे मात्र इसवी सन १६६३ पासूनच्या या ऐतिहासिक ठेव्याच्या आत-बाहेर पडताना आता औरंगाबादकरांचे खड्डयांनी स्वागत होत असे. व्हीआयपी रस्त्याकडून नौबत दरवाजामार्गे पंचकुआ कब्रस्थानकडे जाणाऱ्या या रस्त्याच्या बिकट अवस्थेवर टेंडरनामाने सातत्याने वाचा फोडत व्यवस्थेला जागे केले होते. दरम्यान, जी-२० च्या निमित्ताने दोन दिवसापूर्वी किलेअर्क-व्हिआयपी रस्ता-नौबत दरवाजा समोरील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले.

व्यवस्था आता पूर्ण बदलणार अवस्था

आता टेंडर काढल्याने हा शंभर फुटाचा रस्ता होईल. नौबत दरवाजातून दोन्ही बाजुने बायपास रस्ते होणार असल्याने वाहतूक कोंडी कमी होणार व व्हायंब्रेशनमुळे दरवाजाची पडझड देखील कमी होऊन, त्याचे मजबुतीकरण दिर्घकाळ टिकणार आहे. म्हणून नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार असल्याने औरंगाबादकरांची कोंडी आणि खड्ड्यातून मुक्ती होणार आहे.