Aurangabad
Aurangabad Tendernama
मराठवाडा

औरंगाबाद : लोकार्पणानंतर कोट्यवधींच्या वाहनतळाची कचराकोंडी

संजय चिंचोले

औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबादेतील जिल्हाधिकारी कार्यालयातील पार्किंगचा ताण कमी व्हावा, कार्यालयासमोरील नो - पार्किंग झोनमध्ये चारचाकी लावण्याच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्या पुढाकाराने विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या गुलशन महल निवासस्थानासमोर सरकारी जागेत वाहनतळ निर्माण करण्यात आले. महाराष्ट्रदिनी या भव्य वाहनतळाचा औरंगाबाद जिल्ह्यातील दोन केंद्रीय राज्यमंत्री, चार राज्यमंत्री, एक खासदार आणि तब्बल आठ आमदारांच्या उपस्थितीत मोठा गाजावाजा करत लोकार्पण सोहळा साजरा करण्यात आला होता. पण, अजूनही या वाहनतळात एकही वाहन लावले जात नाही.

या वाहनतळाला आकाशाला गवसनी घालणारे गवत आणि रानटी झाडाझुडपांनी वेढले आहे. शिवाय सर्वत्र कचऱ्याचे ढीग पसरले आहेत. येथील सुरक्षा रक्षकाच्या खोलीला दरवाजे - खिडक्या आणि रंगरंगोटी देखील केली नाही, वाहनतळात फरशी, दिवे देखील बसवलेले नाहीत, असे असताना या अर्धवट वाहनतळाचे लोकार्पण करण्याची घाई तत्कालीन जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी का केली, नेत्यांना खुश करण्यासाठी की ठेकेदाराला खुश करण्यासाठी असे प्रश्न औरंगाबादकर उपस्थित करत आहेत.

नवनियुक्त जिल्हाधिकाऱ्यांकडून औरंगाबादकरांच्या अपेक्षा

तत्कालीन जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्या काळातील चुका दुरुस्त करून वाहनतळातील अर्धवट कामे पूर्ण करून औरंगाबादकरांसाठी हे वाहनतळ खऱ्या अर्थाने उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. यासाठी नवनियुक्त जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांण्डेय यांच्याकडून औरंगाबादकरांना मोठ्या अपेक्षा आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणाऱ्या अवैध पार्किंगमुळे या मुख्य वर्दळीच्या मार्गावर वाहनकोंडी पाचवीलाच पुजलेली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात वाहने लावण्यासाठी वाहनतळात पुरेशी जागा नसल्याने वाहनधारकांची सोय म्हणून वाहतूक पोलिसांकडून देखील सोयीने दुर्लक्ष केले जात आहे. 

आत वाहनतळ फूल, बाहेर रस्त्यावर रांगा

जिल्हाधिकारी कार्यालयात विविध कामानिमित्त दररोज शेकडो नागरिक गर्दी करतात. कार्यालयाच्या आवारातील पार्किंगमध्ये वाहने लावण्यासाठी सोय करण्यात आलेली आहे. मात्र, तेथेही जागा कमी पडत असल्याने बहुतेकांची वाहने या आवाराबाहेर, रस्त्यालगत पार्क केल्याची दिसतात. त्यात चहाची टपरी, फळ विक्रेता यांची दुकानेही प्रवेशद्वाराशेजारीच सर्रासपणे थाटलेली आहेत. विशेष म्हणजे त्या ठिकाणी नो पार्किंगचा फलक लावलेला आहे. मात्र, त्याकडे कानाडोळा करत अनेकजण आपली वाहने येथे उभी करतात. त्यात अनेकदा शासकीय वाहनासह राजकीय पुढाऱ्यांची वाहनेही पार्क केलेली असतात. 

तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी काढला तोडगा

या अवैध पार्किंगला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे २०१६ पासूनच प्रयत्न सुरू होते. त्यात तत्कालीन जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी एस. टी. काॅलनीला लागून जिल्हा प्रशासनाची जागा असल्याचा शोध घेतला. समोरच जिल्हाधिकारी कार्यालय, महसुल विभाग, लेखाकोषभवन आणि विभागीय आयुक्तांचे निवासस्थान असलेले गुलशन महल याचा विचार करून त्याच जागी वाहनतळ निर्माण करण्याचा निर्णय तत्कालीन जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी घेतला होता. त्यानुसार गुलशन महल समोरच या सरकारी खुल्या जागेच्या चारही बाजुंनी आरसीसी भिंत बांधण्यात आली. कारशेट टाकण्यात आले. सुरक्षारक्षकाची खोली आणि दोन्ही बाजुने लोख॔डी गेट बांधण्यात आले.

लोकार्पण झाले पण...

यानंतर १ मे, महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधून तत्कालीन जिल्हाधिकारी चव्हाण यांनी केंद्रिय राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड, रावसाहेब दानवे, तसेच माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई, खा. इम्तियाज जलील, राज्यमंत्री अतुल सावे, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी विधान परिषद अध्यक्ष आ. हरिभाऊ बागडे, आ. सतीश चव्हाण, विक्रम काळे , रमेश बोरनारे, प्रशांत बंब, उदयसिंह राजपूत, संजय सिरसाट यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात लोकार्पण सोहळा पार पाडला होता. मात्र, कोट्यवधी रूपये खर्च करून तयार केलेल्या हे  वाहनतळ आजही लोकांसाठी खुले करण्यात आले नाही. त्याऊलट वाहनतळातील कामे देखील पूर्ण केली नाहीत.

सद्यस्थितीत वाहनतळाच्या जागेवर आजही कचऱ्याचे ढीग व घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे. बाहेर लोकार्पणाचा फलक आणि आत वाहनतळाची कचराकोंडी बनल्याने लोकांना देखील हसू आवरले जात नाही. या प्रकारामुळे तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात केलेल्या विकासकामांवर, तसेच या विकास कामांना जोड देणाऱ्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे.