औरंगाबाद (Aurangabad) : तालुक्यातील गांधेली परिसरातील ग्रामस्थ, पर्यटक आणि निसर्गप्रेमींच्या तक्रारीवरून गट क्रमांक २९७ मध्ये जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी आपला अचानक मोर्चा वळवत सिंघम फेम कारवाई केली. यात तातडीने होत असलेले अवैध गौणखनिज उत्खनन बंद करून चार वाहने जप्त करण्यात आली.
महसुली धाबे दणाणले
दस्तरखुद थेट जिल्हाधिकाऱ्यांनीच कारवाई केल्याचे समजताच जिल्ह्यातील गौणखनिज माफियांसह औरंगाबादसह पैठण, फुलंब्री, सोयगाव, कन्नड, खुलताबाद, गंगापुर, सिल्लोड आणि वैजापुर तालुक्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदारांसह नायब तहसिलदार, तलाठी, मंडळ अधिकारी आणि कोतवालांचे धाबे दणाणले आहे.
असा घेतला बचावात्मक पवित्रा
मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईनंतर जिल्ह्यातील महसूल संघटना एकत्र येत पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या गुरूवारच्या झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीत अनुपस्थित असल्याचा राग म्हणून महसुल अधिकाऱ्यांना राजशिष्टाचार भंगाची नोटीस आणि गांधेलीची कारवाई म्हणून जिल्हाधिकारी सुडाची भावना व्यक्त करत असल्याची तक्रार महसूल कर्मचारी व अधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे करत बचावात्मक पवित्रा केला आहे. मात्र याप्रकरणी कुणाचीही गय केली जाणार नाही जिल्ह्यात कारवाई होणारच या भुमिकेवर जिल्हाधिकारी ठाम आहेत.
औरंगाबाद तालुक्यातील गांधेली शिवारात साई टेकडीसमोर जमीन सपाटीकरणाच्या नावाखाली तब्बल ९ एकर ९ गुंठे डोंगर पोखरणाऱ्यांविरूध्द स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना शुक्रवारी सकाळी कारवाई करावी लागली. यात ३ हायवा, १ पोकलॅन, १ ट्रॅक्टर जप्त केले. यात गट क्रमांक २९७ मध्ये जमीन आहे. सपाटीकरणाच्या नावाखाली तेथे डोंगर पोखरण्यात येत असल्याची माहिती काही भक्त, निसर्गप्रेमी आणि पर्यटकांनी जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्याकडे गुरूवारी केली होती. मात्र त्याच दिवशी पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक असल्याने अवैध गौण खनिजावर कारवाई करता आली नाही. दरम्यान शुक्रवारी सकाळीच जिल्हाधिकारी चव्हाण यांनी अप्पर जिल्हाधिकारी डाॅ. अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, अप्पासाहेब शिंदे, जिल्हाधिकारी गौण खनिज किशोर घोडके तसेच महसुल, आरटीयो, चिकलठाणा पोलीस कर्मचारी व अधिकारी, भूमिअभिलेख व पर्यावरण विभागातील अधिकाऱ्यांचा मोठा लवाजमा घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी थेट कारवाई केली.
दरम्यान, जमीन मालक राजेंद्र पवार यांनी डोंगर आमच्या खाजगी मालकिच्या हद्दीत असल्याने अप्पर तहसिलदारांची परवानगी घेऊनच सपाटीकरण करत असल्याचा दावा केला. मात्र परवानगी ६ सप्टेंबरचीच असताना ३० सप्टेंबरपर्यंत खोदकाम सुरू असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासात उघड झाले. मातीने भराव टाकून सपाटीकरण असा उल्लेख असताना थेट ९ एकर ९ गुंठे डोंगर पोखरून दुसरीकडे वाहतूक होत असल्याचे स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी डोळ्याने पाहिल्यावर तसा पंचनामा करण्यात आला. दरम्यान, चार हायवा, एक पोकलॅन व एक ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. या कारवाईने संपूर्ण जिल्ह्यात महसूल प्रशासन व गौणखनिज करणारे धास्तावले आहेत.