Mumbai-Goa Highway Tendernama
कोकण

मुंबई-गोवा महामार्गाचे काम जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण होणार; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू असून, संपूर्ण प्रकल्प जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendra Singh Bhosale) यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.

याबाबत सदस्य भास्कर जाधव यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य प्रशांत बंब यांनीही सहभाग घेतला. सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले म्हणाले, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पनवेल ते कासू या टप्प्याचे काम मार्च २०२५ पर्यंत तर कासू ते इंदापूर टप्प्याचे काम डिसेंबर २०२५ अखेर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत ३१९ कि.मी. लांबीचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित ३५.३५ कि.मी. लांबीचे काम प्रगतीपथावर आहे. मोठे पूल व उड्डाणपूल वगळता उर्वरित काम मे २०२५ पर्यंत आणि संपूर्ण प्रकल्प जानेवारी २०२६ अखेर पूर्ण होणार आहे.

पनवेल-इंदापूर-झाराप-पात्रादेवी या मार्गावरील काम वेगाने सुरू असून निकृष्ट दर्जाच्या कामांची चौकशी केली जाईल. चिपळूण येथील बहादूर शेख चौकातील उड्डाणपुलाच्या गर्डर लॉचिंगदरम्यान १६ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रीकास्ट काँक्रीटचा भाग कोसळला. या घटनेनंतर संबंधित कंत्राटदाराला ५० लाख व अभियंत्याला २० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे असे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले.