accidents Tendernama
तगादा (तक्रार, गाऱ्हाणी, दाद)

तगादा : खराडीतील 'ते' रस्ते का बनले प्रवाशांसाठी धोकादायक?

टेंडरनामा ब्युरो

खराडी (Kharadi) : खराडीतील मुंढवा पूल, खराडी बायपास, नगररोड जकात नाका तसेच, अंतर्गत रस्त्यावर दगडांनी कठड्याच्यावर भरलेले अतिअवजड वाहने सर्रासपणे वाहतूक करताना दिसतात. अशा वाहतुकीवर नियंत्रण आणण्यास वाहतूक पोलिस अपयशी ठरले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या जिवाशी खेळ होत आहे. अशा वाहनांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली.

खराडी परिसरात विविध शाळा, महाविद्यालये आहेत. मुलांना शाळेत घेऊन जाणारी वाहनांची संख्या तसेच, सायकलवरून शाळेत जाणाऱ्या, दुचाकीवरून कामाला जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. परिसरात लहान-मोठ्या दगडाने काठोकाठ भरलेले डंपर, ट्रक, हायवा असे अतिअवजड वाहने सर्रासपणे वेगाने जाताना दिसतात.

गतिरोधकावर हे वाहन गेल्यावर त्यातील दगड रस्त्यावर पडून मागून येणाऱ्या सायकल, दुचाकीवर किंवा शालेय वाहतूक करणाऱ्या वाहनावर पडून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही.

खराडीत इमारत बांधण्याची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. खोदाई करताना निघालेल्या लहान-मोठ्या दगडाची वाहतूक केली जाते. अशी मोठी वाहने क्षमतेपेक्षा अधिक दगड घेऊन ‘ओव्हरलोड’ वाहतूक नेहमीच करत असतात. त्यामुळे वाहतूक विभागाने लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

रस्त्यावर पादचारी, दुचाकी, तीनचाकी वाहतूक करणाऱ्यांना ‘ओव्हरलोड’ गाड्यांमधून दगड आपल्या वाहनावर कधी कोसळेल, याची भीती वाटते. पोलिस प्रशासनाने क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी, गाडीमालकांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी नेहमीच केली जाते. मात्र, पोलिस लक्ष देत नाहीत.

- सुजित देसाई, स्थानिक रहिवासी

‘ओव्हरलोड’ वाहतूक करणाऱ्या वाहनांविरोधात अनेक महिन्यांपासून नाराजीचा सूर उमटत असून, अशी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कडक नियम लावावेत, अशी मागणी नागरिकांनी पोलिसांकडे अनेकदा केली. परंतु, संबंधित प्रशासन कोणतेही ठोस पाऊल उचलत नाही. त्यामुळे अशा वाहतुकीमुळे मोठा अपघात घडल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जावी.

- अशोक भदाने, स्थानिक रहिवासी

‘हायवा’ मालक, चालकांबरोबर दोन वेळा बैठक झाली होती. तरीही क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक करतात, त्यांच्यावर वाहतूक शाखेकडून कारवाई केली जाते.

- प्रशांत किरवे, पोलिस निरीक्षक, चंदननगर वाहतूक शाखा