पुणे (Pune) : भवानी पेठेतील कासेवाडीत गेल्या अनेक दिवसांपासून सांडपाणी वाहिनी तुंबल्याने नागरिकांच्या घरात व दारात सांडपाणी शिरत आहे. अनेकदा तक्रार करूनही दखल न घेतल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त करत भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात सांडपाणी टाकत धरणे आंदोलन केले.
यावेळी क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी नागरिकांशी चर्चा न करता पळ काढला. नागरिकांना समजताच त्यांनी क्षेत्रीय कार्यालयाचे प्रवेशद्वार बंद करून मागण्यांची पूर्तता करण्यासाठी धरणे आंदोलन केले.
यावेळी लक्ष्मी पवार म्हणाल्या की, ‘‘सांडपाणी घरात साठत असल्याने आम्ही हैराण झालो आहोत. दुर्गंधीमुळे आमच्या मुलांना उलटी, जुलाब सुरू झाले आहे. शाळेत जाण्यासाठी बूट, मोजे खराब होऊ नये म्हणून प्लॅस्टिकच्या पिशव्या पायात घालून मुलांना घरातून निघावे लागते. जनावरांपेक्षा ही वाईट वागणूक आम्हाला मिळत आहे. घरात अन्न शिजवता येत नसल्याने उपाशीपोटी किती दिवस काढणार.’’
या परिसरातील मुख्य रस्त्यावर असलेली सांडपाणी वाहिनी चिखल गाळाने तुंबली आहे. त्यामुळे सांडपाण्याचा प्रवाह उलट दिशेने लोकांच्या घरात जात आहे. अनेक वर्षे ही वाहिनी स्वच्छ केली नसल्याचेही नागरिकांनी सांगितले.
यावेळी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचे साहाय्यक आयुक्त किसन दगडखैर म्हणाले की, ‘‘आम्ही त्याठिकाणी तातडीने काम सुरू केले आहे. सांडपाणी कमी झाले की, गाळ काढण्यात येईल.’’
या आंदोलनात सोनल खिलारे, मीरा वाघमारे, सुनीता वाघमारे, मनीषा वाघमारे, द्वारका खिलारे, लक्ष्मी पवार, वहिदा शेख आदींसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.