इंदापूर (Indapur) : इंदापूर येथील बस स्थानकाचे सुरू असलेले विकासकाम म्हणजे नागरिकांच्या कंठाशी आले प्राण, अशी अवस्था झालेली आहे.
या कामामुळे शहरातील जुन्या पुणे-सोलापूर महामार्गावर नियमित वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. यामध्ये सोमवारी (ता. ३) सकाळी लातूर ते इंदापूर ही बस स्थानकावर प्रवेश करीत असताना वाहतूक कोंडी, नियोजनाचा अभाव यामुळे एक दुचाकी बसच्या मागील चाकाखाली येता येता वाचली. यामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. यामुळे बस स्थानकाचे काम गतीने करण्यासह वाहतुकीला शिस्त लावण्याची गरज आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, इंदापूर बस स्थानकातील रस्ते आणि आवारात सिमेंट काँक्रिटचे काम करण्याचे टेंडर सप्टेंबर २०२४ मध्ये मंजूर करण्यात आले. या कामासाठी दोन कोटी अकरा लाख अंदाजपत्रकीय मूल्य होते. १७ मार्चपर्यंत ठेकेदाराने काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.
बस स्थानकामध्ये डाव्या बाजूकडून बसेस आत येण्यासाठी प्रवेशद्वार आहे आणि बस स्थानकातून बाहेर पडण्यासाठी उजव्या बाजूने प्रवेशद्वार आहे. विकासकामाची सुरुवात उजव्या बाजूने करण्यात आली. सिमेंटचा रस्ता बनवण्याचा असल्याने या कामासाठी वेळ लागत होता. बस स्थानकामधील आवारात व प्लॅटफॉर्मचे काम करण्यासाठी बराच वेळ गेला.
दरम्यानच्या काळात एका बाजूकडून बस ये-जा कराव्या लागत होत्या. परिणामी प्रत्येक दिवशी जुन्या पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी होत होती. बस स्थानकातील विकासाच्या कामामुळे ‘कंठाशी प्राण’ आल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे.
रस्त्यावरून येणारी जाणारी वाहने अन् वाहन पार्किंगची नसलेली सोय या कारणामुळे वाहतुकीवर येणारा ताण अशी स्थिती दररोज होत आहे. सुदैवाने अद्यापपर्यंत दुर्दैवी घटना घडली नसली तरी येणाऱ्या काळात कदाचित घटना घडू शकते.
इंदापूर शहरात होत असलेल्या वाहतूक कोंडीबाबत संबंधित एसटी प्रशासन तसेच ठेकेदार या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नाही. इंदापूर नगर परिषद प्रशासन वाहन पार्किंग संदर्भात ठोस उपाययोजना करताना दिसत नाही. तर या सर्वांत समन्वय नसल्याने पोलिस यंत्रणा हतबल झाल्याचे पाहायला मिळते. यामुळे याबाबत नगरपरिषद प्रशासन, एसटी महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलिस प्रशासन यांनी समन्वयातून मार्ग काढण्याची गरज आहे.
इंदापूर बस स्थानकामध्ये प्रवेश करणाऱ्या बाजूकडील काम अद्याप अपूर्ण आहे. त्यामुळे एकाच बाजू कडून बसेसची ये-जा करावी लागत आहे. जोपर्यंत अपूर्ण काम पूर्ण होत नाही तोपर्यंत प्रवेशद्वार सुरू करता येणार नाही. काम पूर्ण करण्याबाबत पाठपुरावा सुरू आहे.
- हनुमंत गोसावी, आगार व्यवस्थापक, इंदापूर