pcmc, pimpri chincwad Tendernama
तगादा (तक्रार, गाऱ्हाणी, दाद)

तगादा : पालिकेच्या 'त्या' प्रयोगामुळे पिंपरीतील वर्दळीच्या चौकात वाहतुकीचा खोळंबा

टेंडरनामा ब्युरो

पिंपरी (Pimpri): शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (मोरवाडी) चौकात रिक्षा आणि अन्य वाहनांचे रस्त्यावरच पार्किंग केले जाते. त्यात सिग्नलची वेळ कमी असल्याने नेहमीच वाहतूक कोंडी होत आहे. त्यात महापालिकेने चौकातच ‘ट्रॅफिक आइसलॅंड’ अर्थात वाहतूक बेटाचे नियोजन केले आहे. यासाठी ब्लॉक टाकण्यात आले आहेत. त्यामुळे कोंडीत भर पडली आहे. त्यामुळे महापालिकेने हा प्रयोग करू नये, असे पत्र वाहतूक पोलिसांनी दिले आहे. मात्र, तरीही पालिका प्रशासन या प्रयोगावर ठाम आहे.

मोरवाडी चौकातून पिंपरी गाव, चिंचवड, नेहरूनगर, लांडेवाडी, भोसरी, मोशीकडे जाता येते. त्यामुळे या चौकात सतत वर्दळ असते. गेल्या काही दिवसांपासून या चौकात सतत वाहतूक कोंडी होत आहे. येथील दोन-तीन मोठ्या संकुलांमध्ये ग्राहक मोठ्या प्रमाणावर येतात. हे नागरिक मेट्रो मार्गाखालील मोकळ्या जागेत वाहने उभी करतात.

संबंधित आस्थापनांसमोरील जागा अपुरी पडत असल्याने बऱ्याच वेळा नागरिक पदपथावरच वाहने पार्किंग उभी करतात. त्यामुळे पादचाऱ्यांचाही खोळंबा होत आहे. त्यात रिक्षांचीही भर पडते. यामुळे वाहनांच्या दूरवर रांगा लागतात.

मोरवाडी चौकातील सिग्नलची वेळ वाढवली असली, तरी वाहतूक कोंडीत काहीही फरक पडलेला नाही. निगडी मार्गाकडील चौकातील रिक्षांमुळे वाहतूक कोंडी होते. शहरी पथ धोरणांतर्गत (अर्बन स्ट्रीट गाइड लाइन्स) पदपथ विकसन आणि मेट्रो स्थानकामुळे रस्ते अरुंद झाले आहेत.

त्यात आता महापालिकेने मोरवाडी चौकात वाहतूक बेट उभारण्याचे नियोजन केले आहे. यासाठी सिमेंटचे ब्लॉक टाकले आहेत. त्यामुळे रस्ता अरुंद होऊन सिग्नल सुटल्यानंतरही वाहनांची गती कमी होऊन कोंडी वाढत आहे.

मोरवाडी चौकातील नव्या वाहतूक बेटाचे काम तांत्रिकदृष्ट्या अयोग्य वाटते. त्यामुळे मार्गिकेची रुंदी कमी होऊन उपलब्ध सिग्नलची वेळही पुरेशी नसेल. हे सुशोभीकरण रद्द करण्यात यावे.

- दीपक भोजने, स्थानिक नागरिक, मोरवाडी

वाहतूक बेटासाठी सध्या टाकलेल्या सिमेंट ब्लॉक्समुळेच वाहतूक कोंडी होत आहे. त्यात आणखी भर पडणार असल्यामुळे वाहतूक बेट उभारू नये, यासाठी आम्ही महापालिकेला पत्र पाठविले आहे.

- वर्षाराणी पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक

नागरिकांना एकाच वेळी ६० मीटर रस्ता ओलांडणे शक्य नाही. त्यामुळे वाहनचालकांना थांबण्यासाठी वाहतूक बेट तयार करण्यात येत आहेत. वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढणारच आहे. फक्त वाहनचालकांनाच प्राधान्य द्यायचे का?

- बापू गायकवाड, सहशहर अभियंता, महापालिका