tagada
tagada Tendernama
तगादा (तक्रार, गाऱ्हाणी, दाद)

तगादा : रामटेक-तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर 'हा' रेल्वे उड्डाणपूल धोकादायक बनलाय का?

टेंडरनामा ब्युरो

भंडारा (Bhandara) : रामटेक-तुमसर-गोंदिया या राष्ट्रीय महामार्गावर देव्हाडी येथे रेल्वे उड्डाणपुलाच्या टॉपवरील दगड क्रैक झाले आहेत. तुमसर रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून दगडांचे क्रॅक स्पष्ट दिसतात. यात तांत्रिक बिघाड आले की अन्य कोणत्या कारणाने टॉपच्या सिमेंट दगडात तडे गेले, हे कळणे गरजेचे आहे. दगडांना तडे गेल्याने ती धोक्याची घंटा तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. स्थापत्य अभियंत्याकडून तडे गेलेल्या सिमेंट दगडांची निरीक्षण करण्याची गरज आहे.

रामटेक- तुमसर-गोंदिया या राष्ट्रीय महामार्गावर देव्हाडी येथे उड्डाणपूल बांधकाम करण्यात आले. मागील दोन वर्षांपासून या उड्डाण पुलावरून राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरू आहे. यात जड वाहनांच्या मोठा समावेश असतो. क्षमतेपेक्षा अधिक वजनाचे ट्रक येथून 24 तास धावतात.

या पुलावरून वाहनाची गती 40 ते 50 किलोमीटर प्रति तास असते. वाहतुकीचे फलक येथे संबंधित विभागाने लावले आहेत. परंतु येथे सर्रास नियम पायदळी तुडविले जात आहेत. उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर येथे संबंधित विभागाचे अधिकारी थातूरमातूर पाहणीकरिता येतात आणि जातात. नियमितपणे संबंधित विभागाकडून पाहणी व चौकशी केली जात नाही. उड्डाणपूल व रस्त्याची जबाबदारी ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे आहे.

तांत्रिक त्रुट्या केल्या होत्या दूर :

येथील उड्डाणपुलातून मोठ्या प्रमाणात राख वाहून गेली होती. त्या कारणांच्या शोध लावून पोलाद पोकळी निर्माण झाल्यामुळे हा पूल वाहतुकीकरिता धोकादायक ठरला होता. त्यामुळे नागपूर येथील व्हीएनआयटीचे स्थापत्य अभियंते व तज्ज्ञ यांचे पथक येथे वेळोवेळी येऊन गेले. त्यांनी उड्डाणपुलातील पोकळी भरून काढण्याच्या सूचना व निर्देश देत तांत्रिक समस्या दूर केल्या होत्या.

उड्डाणपुलात फुगवटा :

देव्हाडी रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून टॉपच्या दगडात तडे गेल्याचे स्पष्ट दिसते. तडे गेलेल्या भागात उड्डाणपुलात फुगवटा आल्याचेही दिसून येत आहे. उड्डाणपुलावरून जड वाहतूक सुरू असते. त्यामुळे सिमेंट दगडाला तडे जाण्याचे शास्त्रीय कारण येथे शोधण्याची गरज आहे. अती वजनाने दगडांना तडे गेले काय असा प्रश्न येथे उपस्थित होतो.