Pune PMC Tendernama
तगादा (तक्रार, गाऱ्हाणी, दाद)

तगादा : नागरिकांच्या तक्रारींना ठेकेदाराकडून कचऱ्याची टोपली

टेंडरनामा ब्युरो

मुंढवा (Mundhva) : ताडीवाला रस्ता परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून महापालिकेकडून विविध चेंबर, पावसाळी गटारे व पावसाळी वाहिन्यांची दुरुस्ती केली जात आहे. या कामादरम्यान निघालेले तुटलेले पाइप व इतर राडारोडा ठेकेदारांकडून रस्त्याच्या कडेला टाकण्यात आला आहे. नागरिकांनी याबाबत महापालिकेकडे अनेक तक्रारी केल्या आहेत, मात्र ठेकेदाराने याची गांभीर्याने दखल घेतली नाही. त्यामुळे हा राडारोडा येथून लवकर उचलण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

दरवर्षी शहरातील नाले, ओढे, कल्व्हर्ट, पावसाळी वाहिन्या व गटारांची दुरुस्ती महापालिकेकडून केली जाते. त्यासाठी क्षेत्रीय कार्यालय व स्थानिक नगरसेवक यांच्या वॉर्डस्तरीय निधीतून टेंडर मागवले जाते. परंतु मुख्य खात्याकडून राडारोडा उचलण्याचे टेंडर ठेकेदाराला देण्यात आले असूनही ठेकेदाराकडून कामचुकारपणा करण्यात येत आहे.

त्यामुळे ताडीवाला रस्ता परिसरातील लडकतवाडी रस्ता, पन्नास चौक, लोकसेवा वसाहत, ढोले पाटील रस्ता येथून डिझेल कॉलनी, पाच बिल्डिंग मैदान, पत्राचाळ, प्रायव्हेट रस्ता येथे ठिकठिकाणी राडारोडा साठला आहे. परिणामी वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. प्रशासनाने याची दखल घेत ठेकेदाराकडून हा राडारोडा उचलून घ्यावा, अशी मागणी होत आहे.

ठेकेदाराने ड्रेनेजचे पाइप बदलून जुने सिमेंटचे पाइप बऱ्याच दिवसापासून रस्त्याच्या कडेला टाकले आहेत. त्या ठिकाणी स्थानिक नागरिकांकडून बांधकामाचा राडारोडा व कचरा टाकला जात आहे. त्यामुळे डास व दुर्गंधी वाढल्याने माझ्या घरातील व शेजारची लहान मुले आजारी पडली आहेत. याबाबत महापालिकेतील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता दाद दिली जात नाही.

- मयूर गायकवाड, स्थानिक नागरिक

ताडीवाला रस्ता भागात मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी असल्याने गटारी, चेंबर, नाले साफ करून निघालेला गाळ व माती, तसेच बदललेले पाइप रस्त्याच्या कडेला टाकून दिले आहेत. नागरिकांनी संबंधिताला फोन केला असता या परिसरातील लहान गल्ल्यांमुळे गाडी पाठविता येत नाही, असे सांगून टाळाटाळ केली जात आहे. हे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी.

- प्रदीप गायकवाड, स्थानिक नागरिक

ताडीवाला रस्ता भागात मुख्य खाते, स्थानिक निधी क्षेत्रीय कार्यालय, पथ व सांडपाणी विभागाकडून विविध कामे सुरू आहेत. त्यातून निघालेला राडारोडा अभियंत्यांना सांगून उचलण्यास सांगतो.

- हेमंत किरुळकर, सहायक आयुक्त, ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय