नातेपुते (Solapur) : नातेपुते नगरपंचायत हद्दीतील अंतर्गत रस्त्याच्या कामासाठी खासदार निधीतून ५० लाख रुपयांचा निधी दोन वर्षांपूर्वी तत्कालीन खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या कारकिर्दीत मंजूर झालेला आहे. हा निधी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वर्गही झाला असून, मागील दोन वर्षांपासून ठेकेदार काम करीत नाहीत अशी सबब सांगून अद्यापही काम सुरू झालेले नाही. ही कामे सुरू करावीत यासाठी नगरसेवक व अन्य लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांना अनेकदा सांगूनही काम सुरू होत नाही.
नातेपुते शहर हे पुणे-सातारा-सोलापूर या तीन जिल्ह्यावर वसलेले महत्त्वाचे व्यापारी केंद्र आहे. शहरात फक्त एकच मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावर दिगंबर जैन समाजाचे भगवान महावीरांचे मंदिर व हिंदू धर्मीयांचे श्री राम मंदिर व हनुमान मंदिर अशी महत्त्वाचे मंदिरे असून, या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात सराफी दुकाने, कापड, किराणा दुकाने आहेत. या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे.
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते ओढ्यापर्यंत तसेच हनुमान चौक ते बुरजाजवळील चौक या दोन रस्त्यांसाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत ५० लाखांचा निधी बांधकाम खात्याकडे दोन वर्षांपूर्वी वर्ग झाला आहे. याचे दोन वेळा टेंडर ही झाले आहे. मात्र अधिकाऱ्यांचा ठेकेदारांवर वचक नसल्यामुळे हे काम होऊ शकत नाही. पुढच्या कामासाठी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार उत्तम जानकर, माजी आमदार राम सातपुते यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले.