Yavatmal
Yavatmal Tendernama
तगादा (तक्रार, गाऱ्हाणी, दाद)

तगादा : यवतमाळमध्ये सुपर स्पेशालिटी रुग्णालयात 150 कोटींची यंत्रसामग्री धूळखात

टेंडरनामा ब्युरो

यवतमाळ (Yavatmal) : यवतमाळ जिल्ह्यातील गरीब रुग्णांना अतिविशेष उपचार मिळावेत, या उद्देशाने 150 कोटी रुपये खर्चुन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची पाच मजली इमारत उभारण्यात आली. या इमारतीचे काम पूर्ण होऊन तीन वर्षे लोटली आहेत. या रुग्णालयात 8 विभाग प्रस्तावित असून, तेथे अतिविशेष उपचार मिळणार आहेत. यासाठी 285 यंत्र खरेदी करण्यात आली आहेत. त्यांची किंमत कोट्यवधीच्या घरात आहे. मात्र, ही यंत्र आता धूळखात पडली आहेत.

या रुग्णालयात कार्डिओ (हृदयरोग), न्यूरोसर्जरी, युरोलॉजी, न्युओनेटल सर्जरी (बालरोग शल्य चिकित्सा), नेफ्रोलॉजी, बर्न वॉर्ड व प्लास्टिक सर्जरी सुविधा, रेडिओलॉजी अशी प्रमुख उपचार सुविधा राहणार आहे. यासाठी सहा मॉड्यूलर ओटी तयार केल्या आहेत. त्याठिकाणी अतिशय उच्च तंत्रज्ञानाची अद्ययावत मशिनरी आहे. सोबतच सेंट्रल स्टरिलाईज युनिट तयार आहे. विविध प्रकाराच्या उपचारांसाठी महागड्या 285 मशिनरी आणल्या आहेत. यापैकी 214 मशिनरी हॉस्पिटलच्या विविध विभागांत इन्स्टॉल केल्या आहेत, तर 71 मशिनरी अजूनही इन्स्टॉल झालेल्या नाहीत. 

ही प्रक्रिया एचएलएल हाईड्स, नोयडा दिल्ली यांनी केली आहे. ही सर्व यंत्र सामग्री मागील तीन वर्षांपासून धूळखात आहे. या इमारतीमध्ये वीज पुरवठा नसल्याने पाचही मजल्यांवर काळोख पसरला आहे. दिवसाही येथे एकट्याने फिरण्यास भीती वाटावी, अशी स्थिती आहे. याच रुग्णालयात दहा खाटांचे डायलिसिस युनिट प्रस्तावित आहे. त्यासाठी मनुष्यबळ नसल्याने ते बंद आहे. 

ग्रामीण जिल्ह्यातील रुग्णालयात अतिविशेष उपचारासाठी थेट नागपूर येथे रेफर केले जाते. अनेक रुग्ण तर पुढील उपचारासाठी महानगरात जात नाहीत. त्यामुळे अशा रुग्णांची जीवनयात्रा अर्ध्यावर संपते. मेंदू व स्पाइन सर्जरी, कार्डिओ उपचार सुविधा नसल्याने अशा रुग्णांना रेफर केल्यानंतर रस्त्यातच कित्येकांचा मृत्यू होते. हे वास्तव असतानाही सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत. याबाबत संताप व्यक्त होत आहे.

सुपरसाठी असे हवेत डॉक्टर : 

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्यासाठी येथे प्रमुख आठ विभागांत आठ प्राध्यापक, आठ सहयोगी प्राध्यापक आणि सहा सहायक प्राध्यापकांची आवश्यकता आहे. सोबतच वरिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी 14, वर्ग 3 कर्मचाऱ्यांची 97 पदे, तंत्रज्ञ 7, वर्ग 4 कर्मचारी 86 हवे आहेत. या सर्व पदांना मान्यता मिळाली आहे. त्यानंतरही पदभरती झालेली नाही. त्यामुळे रुग्णालय सुरू झालेले नाही. आता केवळ अधीक्षक म्हणून डॉ. रोहिदास चव्हाण यांना नियुक्ती मिळाली आहे. मात्र, त्यांच्याकडे अधिनस्थ यंत्रणाच नसल्याचे चित्र आहे.