Gondia
Gondia Tendernama
तगादा (तक्रार, गाऱ्हाणी, दाद)

तगादा : 'या' शहरातील 168 जीर्ण इमारतींकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष; कोसळण्याचा धोका

टेंडरनामा ब्युरो

गोंदिया (Gondia) : शहरात 168 जीर्ण इमारती असून त्या कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र आजतागायत नगर परिषदेने याकडे लक्ष दिले नसल्याने मोठी घटना घडण्याची शक्यता आहे. गेल्या पावसाळ्यात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घरांची पडझड होऊन नुकसान झाले होते. शहरातील मोडकळीस आलेल्या इमारतींचे नियोजन करणेही गरजेचे झाले आहे.

अनुचित घटना टाळण्यासाठी नगर परिषदेने जीर्ण इमारतींचे सर्वेक्षण करून 168 मोडकळीस आलेल्या इमारतींच्या मालकांना नोटीस पाठवल्या. मात्र अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. दरवर्षी पावसाळा आला की, जीर्ण इमारतींचा प्रश्न ऐरणीवर येतो. जीर्ण इमारतींबाबत ओरड झाल्यानंतर नगर परिषदेने इमारत मालकांना नोटीस बजावली जाते. मात्र आजपर्यंत एकही जीर्ण इमारत नगर परिषदेने पाडली नाही. शहरात अनेक जीर्ण इमारती असून, त्याच्या नोंदीही नगर परिषदेकडे आहेत.

पावसाळ्यात निर्माण होणारा धोका लक्षात घेऊन नगर परिषदेने नगररचना विभागामार्फत शहरातील मोडकळीस आलेल्या इमारतींचे सर्वेक्षण केले. त्यात 168 इमारती जीर्ण असल्याचे आढळून आले. नगर परिषदेने इमारत मालकांना नोटीस बजावली आहे. यांतील काही इमारती जीर्ण आणि धोकादायक आहेत. त्यामुळे यापासून धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.