Tagada Tendernama
तगादा (तक्रार, गाऱ्हाणी, दाद)

तगादा : भोसरी, दिघी परिसरातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य, वाहनचालकांकडून...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : भोसरी, इंद्रायणीनगर आणि दिघी परिसरातील काही रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. दुचाकी घसरून वाहन चालकांना दुखापतही होत आहे. येत्या पावसाळ्यापूर्वी रस्त्यांचे डांबरीकरण करण्याची मागणी वाहन चालक आणि नागरिकांमधून होत आहे.

भोसरी, दिघी, इंद्रायणीनगरातील रस्त्यांवर गटारे आणि पावसाळी वाहिन्यांचे चेंबर आहेत. मात्र त्यांची पातळी रस्त्याच्या पातळीशी साधली गेली नसल्याने ते रस्त्यावर खड्ड्यांचे काम करत आहेत. भोसरी गावठाण परिसर, छत्रपती संभाजी महाराजनगरातील कै. सखुबाई गवळी उद्यानाजवळील रस्ता आणि गवळीनगरातील दोन अंतर्गत रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. मात्र त्यावरील चेंबरजवळ खड्डे पडले आहेत. त्यामुळे सिमेंटचे गुळगुळीत रस्ते असतानाही वाहन चालकांना त्या रस्त्याने जाताना कसरत करावी लागत आहे. भोसरीतील इंद्रायणीनगरातील पेठ क्रमांक दोनमधील भाजी मंडईसमोरील रस्ता, मिनी मार्केट चौक, नाना नानी पार्ककडे जाणारा रस्ता, इमारत क्रमांक ४८ जवळ, पेठ क्रमांक सातमधील मोरया चौक, भोसरी एमआयडीसीतील जुने संकेत हॉटेल चौक ते ईएल ब्लॉककडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे आहेत. इंद्रायणीनगरातील काही अंतर्गत रस्त्यावर कामानिमित्त चर खोदलेल्या आहेत. त्याचप्रमाणे दिघीतील संत निरंकारी भवन ते आदर्शनगरकडे जाणारा रस्ता, सह्याद्री कॉलनी क्रमांक तीन समोरील रस्ता, भारतमातानगर आदींसह दिघीतील अंतर्गत रस्त्यावर खड्डे आहेत.

आणखी कुठे आहेत खड्डे ?

भोसरीतील लांडेवाडीतील टेल्को रस्त्यावर निगडीकडील बाजूचे बस स्थानक, शांतीनगर रस्ता क्रमांक एक समोरील रस्ता, भोसरी गावठाणातील मारुती मंदिराजवळ, खंडोबामाळकडे जाणारा रस्ता, गवळीनगरमधील अंतर्गत रस्ते, लांडेवाडीतील महिंद्रा सीआयई गेट क्रमांक एकजवळ, महावितरण कार्यालयाकडे जाणारा रस्ता, नाशिक - पुणे महामार्गाच्या सेवा रस्त्यावर एचडीएफसी बॅंकेजवळ, चांदणी चौक, गव्हाणे वस्तीतील जुन्या भोसरी रुग्णालयासमोरील रस्ता, चक्रपाणी वसाहतीतील अंतर्गत रस्ते आदी भागांतील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत.

खड्ड्यांमुळे होणारे नुकसान

- खड्डा लक्षात न आल्यास जोराने आदळून वाहनांचे नुकसान

- काही वेळा खड्ड्यांतून वाहने घसरून वाहन चालकांना अपघात होण्याचे प्रकार

- खड्ड्यांच्या रस्त्यांमधून सतत वाहने चालविल्याने वाहन चालकांना पाठदुखीचा त्रास

- रुग्ण, ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांना अशा रस्त्याने नेताना अधिक त्रास

बीआरटीएस विभागाचे दुर्लक्ष

भोसरीतील टेल्को रस्ता, पुणे - नाशिक महामार्गाचा सेवा रस्ता, दिघीतील पुणे - आळंदी रस्ता हे महापालिकेच्या बीआरटीएस विभागाकडे आहेत. मात्र या रस्त्यावरील खड्ड्यांकडे बीआरटीएस विभागाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. गेल्या एक वर्षांपासून लांडेवाडीतील चौकात पडलेला खड्डा अद्यापही बीआरटीएस विभागाने बुजविलेला नाही. त्याचप्रमाणे याच चौकातील रस्त्याच्या दुभाजकाच्या झालेल्या दुरवस्थेकडेही बीआरटीएस विभागाने कानाडोळा केला आहे.

इंद्रायणीनगरातील रस्त्यावरील चरींचा अधिक त्रास होतो. त्याचप्रमाणे रस्त्यावरील खड्डे चुकवताना दुचाकीचा तोल जाण्याची शक्यता असल्याने खड्डे अपघाताला निमंत्रण ठरत आहेत.

- विकास सत्रे, कामगार

मुरूम-मातीने पावसाळ्यात भरलेले खड्डे पावसामुळे पुन्हा उघडे पडून ‘जैसे थे’ स्थिती होते. त्यामुळे महापालिकेने रस्त्यावरील खड्डे पावसाळ्यापूर्वी डांबरीकरण करुन बुजवावेत. कारण पावसाळा सुरू झाल्यावर डांबरीकरण करता येत नाही.

- राहुल वाळके, वाहन चालक

नागरिकांच्या अथवा सारथीवर आलेल्या तक्रारीनुसार रस्त्यावरील खड्डे भरले जातात. हे काम सुरूच आहे. त्याचप्रमाणे परिसरातील रस्त्यांची पाहणी करून रस्त्यावरील खड्डे भरले जातील.

- सुनीलदत्त नरोटे, कार्यकारी अभियंता, स्थापत्य विभाग, क क्षेत्रीय कार्यालय

रस्त्याची पाहणी करून त्यावरील खड्डे भरून घेतले जातील. पावसाळ्यापूर्वी रस्त्यावरील खड्डे डांबरीकरणाने भरले जातील. भोसरीतील दिघी रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणाला लवकरच सुरूवात होईल.

- शिवराज वाडकर, कार्यकारी अभियंता, स्थापत्य विभाग, ई क्षेत्रीय कार्यालय