Aurangabad
Aurangabad Tendernama
तगादा (तक्रार, गाऱ्हाणी, दाद)

तगादा : वार्डात ड्रेनेज लाईन फुटल्याची तक्रार करायची कुणाकडे?

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabd) : सिडको एन-सहा येथील संभाजीनगर एफ सेक्टर व यशवंतराव चव्हान शाळा परिसरात सहा महिन्यापासून ड्रेनेज फुटल्याच्या तक्रारीची महापालिका दखल घेत नाही, म्हणून या भागातील नागरिकांना करावी कोणाकडे असा प्रश्न पडला आहे.

उपरोक्त उल्लेखीत भागात गेल्या सहा महिन्यांपासून ड्रेनेज फुटल्याने गटारगंगा गजबजलेल्या नागरी वसाहतीतील अरूंद रस्त्यांवर वाहत आहे. यासाठी येथील नागरिकांसह मनीष नरवडे (जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) गट यांनी यासंदर्भात महापालिका झोन कार्यालयात वारंवार तक्रार केली. पण त्यांना आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही.

येथील ड्रेनेज लाइन खुप जुनाट झाली आहे.त्यामुळे ड्रेनेज चोकअप होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. जुनाट लाइनची वयोमर्यादा संपल्याने मैला वाहून नेण्याची  तिच्यात क्षमता नाही. चोकअप काढणे कामगारांना देखील अशक्य होऊन बसले आहे. महापालिकेने काहीतरी पर्याय काढून ड्रेनेजचे चोकअप काढावे, अन्यथा ड्रेनेजलाइन बदलावी अशी या भागातील नागरिकांनी मागणी आहे. गेल्या काही महिन्यांपासून नागरिक महापालिकेकडे याप्रश्नाचा पाठपुरवा करीत आहेत, पण आश्वासनाशिवाय त्यांना काहीच मिळत नाही.

गेल्या आठवड्यात याच भागातील नागरिक पुन्हा एकदा महापालिकेत तक्रार घेऊन गेले होते. यावेळी देखील त्यांना आश्वासनच मिळाले.त्यामुळे आता तक्रार करावी कुणाकडे असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. ड्रेनेजची गटारगंगा शाळेपासून धार्मीक स्थळापर्यंत वाहत असल्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे आता  महापालिका प्रशासकांनी यासंदर्भात ठोस आदेश द्यावेत, अशी मागणी नरवडे यांनी केली आहे.