
पुणे (Pune) : पुणे-बेंगळूर महामार्गालगत (Pune Bengaluru Highway) बालेवाडी येथे असणाऱ्या सेवा रस्त्याची दुरवस्था झाली आहे. येथे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना सतत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
खड्डे अन् कोंडीतून मार्ग काढताना नागरिकांचा जीव मेटाकुटीस येत आहे. येथील सेवा रस्ता त्वरित दुरुस्त करण्याची मागणी या भागातील नागरिक करत आहेत.
पुणे-बेंगळूर महामार्गाजवळील बालेवाडी पोस्ट ऑफिस जवळच्या सेवा रस्ता खराब झाला असून या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यातच या ठिकाणी सतत कोंडी होत असते. कोंडीतून मार्ग काढताना दुचाकीस्वार पादचारी मार्ग वरून उलट्या दिशेने दुचाकी नेतात. त्यामुळे कोंडीमध्ये अधिक भर पडते.
तसेच येथील पादचारी मार्गावरच पावसाळी वाहिनीचे मोठे चेंबर असून, त्याचे झाकण गेल्या अनेक महिन्यांपासून गायब झाले आहे. हा चेंबर खोल असून या चेंबरमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात कचरा, प्लास्टिक जमा झाले आहे. चेंबर पादचारी मार्गावर असल्यामुळे त्याचे झाकण नाही, हे लक्षात न आल्याने अनेक नागरिक यात पडून जखमी झाले आहेत. त्यामुळे रस्ता दुरुस्तीसह चेंबर साफ करून त्याचे झाकणही बसवावे अशी मागणी नागरिक करत आहेत.
येथील सेवा रस्त्यावर भरपूर खड्डे पडले असून येथे सातत्याने कोंडी होत असते. खड्डे चुकविताना अनेक नागरिकांचे छोटे-मोठे अपघात होऊन आपापसांत वादविवाद होतात. चेंबरचे झाकण गायब झाल्यामुळे अनेक नागरिक या चेंबरमध्ये पडून जखमी झाले आहेत. रस्ता दुरुस्त करावा तसेच चेंबरचे झाकणही लगेच बसवावे.
- अभिजित कळमकर , बाणेर
अनेक ठिकाणी चेंबरवर झाकणे बसवली जातात, त्याला बाजूला सिमेंट लावले जाते. परंतु यावर सलग दोन-तीन दिवस पाणी टाकणे गरजेचे असते, ते न टाकल्यामुळे थोडे दिवसांतच सिमेंट निघून जाते. त्यामुळे झाकण खचते. तसेच गायब होते.
- दत्ताजीराव बर्गे, बालेवाडी
या रस्त्यासाठी असलेले टेंडर मान्य करून हा रस्ता, तसेच येथील पदपथ ही तातडीने दुरुस्त करण्यात येणार आहे. रस्त्यावरील खड्डे दुरुस्ती करून पदपथावरील चेंबरचे झाकणही त्वरित बसवून घेणार आहे.
- दिलीप काळे, उपअभियंता, पथ विभाग, पुणे महापालिका