
पुणे (Pune) : पुणे- मुंबई महामार्गावर (Pune - Mumbai Highway) देहूरोड सेंट्रल (Dehuroad Central) चौकात वाहतुकीची समस्या जटिल झाली आहे. रोजच होणाऱ्या कोंडीमुळे वाहन चालक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे या ठिकाणी रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) भुयारी मार्ग करावा, अशी मागणी देहूरोड, शेलारवाडी, मामुर्डी, साईनगरवासीयांनी केली आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील सेंट्रल चौकास पुणे, मुंबई, कात्रज बायपास, मामुर्डी, साईनगर हे रस्ते जोडलेले आहेत. त्यामुळे चौकावर वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. हा रस्ता सध्या चार पदरी आहे. दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असताना दुसरीकडे रस्त्याची रुंदी मात्र तेवढीच आहे. सकाळी कामावर जाणारे आणि संध्याकाळी घरी परतणाऱ्यांना अधिक वेळ कोंडीतून मार्ग काढावा लागत आहे.
तातडीच्या कामासाठी जवळपास कुठे जायचे असल्यास, या कोंडीमुळे सर्वांनाच मनस्ताप सहन करावा लागतो.
- डॉ. कीर्ती कोहली, नागरिक, चिंचोली
देहूरोड येथून मावळ भागात वेगवेगळ्या ठिकाणी माल पोचवण्यास जाणाऱ्या व्यापाऱ्यांना या कोंडीत अडकून पडण्याचा अनुभव रोज येत आहे.
- मनोज गोयल, संजय माळी व्यापारी
शनिवारी आणि रविवारी नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहेत. यात लोणावळ्याला फिरण्यास जाणाऱ्यांची अधिक वाहने आहेत. कंटेनरला सेंट्रल चौकात वळण्यास वेळ लागतो. परिणामी कोंडी होते. चौकात चार वाहतूक पोलिस ठेवूनही काही उपयोग होत नाही.
- पद्माकर घनवट, सहायक पोलिस आयुक्त, देहूरोड विभाग