

पुणे (Pune): बाणेर-पाषाण परिसरातील वाढत्या नागरी समस्यांमुळे नागरिकांचा संताप तीव्र झाला असून, वाहतूक कोंडी, खोदलेले रस्ते, अतिक्रमण आणि अपुऱ्या सुविधांमुळे दैनंदिन जीवन विस्कळित झाले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आणि वाहतूक पोलिस प्रशासनाने समन्वयाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
बाणेर ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रस्ता हा प्रशासनाच्या अपयशाचे उदाहरण ठरत आहे. खड्डे, धूळ आणि वाहतुकीचा गोंधळ हा रोजचा त्रास बनला आहे. मालमत्ता कर भरूनही नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नाहीत. हा रस्ता पाहिला की अक्षरशः संताप येतो. आपण स्मार्ट सिटीमध्ये राहतो की एखाद्या दुर्लक्षित गावात? तुम्ही पुणेकरांना चालण्यासाठी साधा रस्ता देऊ शकत नाही, तर इतका प्रचंड मालमत्ता कर कशासाठी? पगार वेळेवर, सुविधा शून्य. हा कोणता न्याय? आता पुरे झाले! चांगला रस्ता द्या नाहीतर कर थांबवा. पुणेकर आता गप्प बसणार नाहीत, असे मत बाणेर परिसरातील एका रहिवाशाने व्यक्त केले आहे.
पाषाण-बाणेर लिंक रस्त्यावर सुरू झालेल्या पासपोर्ट सेवा केंद्राचे स्वागत आहे. मात्र, येथे मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा वाढणार असल्याने वाहतूक कोंडी, पार्किंगची समस्या, अनधिकृत विक्रेत्यांमुळे सुरक्षेच्या अडचणी निर्माण होत आहे. बाणेर रस्त्यावर खोदलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी महापालिका प्रशासनाने योग्य नियोजन करावे. पोलिस बंदोबस्त आणि वाहतूक व्यवस्थापनाकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे.
- सुहास कल्याणी, पाषाण
पाषाण परिसरातून शिवाजीनगरकडे जाण्यासाठी अनावश्यक वळसे घ्यावे लागत आहेत. उड्डाणपुलाचा अपेक्षित उपयोग होत नसून, प्रवासात वेळ आणि पैशांचा अपव्यय होत आहे. मेट्रो प्रकल्पाचाही पाषाणकरांना विशेष फायदा होत नसल्याने नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे.
- सदानंद अंदे, पाषाण.
बाणेर रस्ता हा अडथळ्यांची शर्यत बनला आहे. मेट्रो प्रकल्प, पथविभाग आणि वाहतूक पोलिस यांच्यात समन्वयाचा अभाव स्पष्ट दिसतो. पार्किंगच्या समस्येमुळे रस्त्यांवरच वाहने उभी राहतात. त्यामुळे बाणेर-बालेवाडी-पाषाण परिसरात बहुमजली पार्किंगची तातडीने उभारणी करणे आवश्यक आहे.
- अतुल करंजवणे
बाणेर रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि पादचाऱ्यांना होणारा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे. सदानंद रेसिडेन्सीजवळील सबवे, अमर बिझनेस पार्क परिसरातील सिग्नल आणि अरुंद रस्त्यांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना होणारे पार्किंग ही गंभीर समस्या असून, योग्य नियोजनाची गरज आहे.
- माया हेमंत भाटकर, बाणेर.
औंध क्षेत्रीय कार्यालयांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते भाऊ पाटील पाडळवस्ती दरम्यान रस्त्यालगतचे चेंबर मोठ्या प्रमाणात खचले आहेत. या ठिकाणी वाहतुकीचा मोठा वापर होत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित चेंबरची तातडीने दुरुस्ती करून रस्ता समांतर करावा.
- विलास सदाशिव शेडगे, औंध