
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शेंद्रा पंचतारांकीत औद्योगिक वसाहत आणि ऑरिक सिटीमुळे सिडको-हडको ते मुकुंदवाडीपासून २५ किलीमीटर दूर करमाड पर्यंत शहराचा विस्तार वाढला आहे. बीड बायपास, सातारा-देवळाई, बाळापूर, गांधेली, सुंदरवाडी, चितेगावपर्यंत मोठमोठी गृहप्रकल्प आकारले जात आहेत. त्यामुळे मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनचा आगामी काळात विस्तार होऊन मोठ्या रेल्वेस्टेशनप्रमाणे विस्तार आणि विकास करणे गरजेचे आहे. मात्र सुविधा देण्यासाठी जागाच नसल्याचे कारण रेल्वेकडून पुढे केले जात आहे. त्यामुळे यापुढील काळात जागेअभावी हे रेल्वेस्टेशन ‘जैसे थे’ राहणार का? रेल्वेना थांबा आणि मोजक्या सुविधांवर प्रवाशांना समाधान मानावे लागणार आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
१९९६ मध्ये पूजन झाल्यानंतर २००० मध्ये हे मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन पूर्णत्वास आले. ९ जानेवारी २००० रोजी हे हॉल्ट स्टेशन सुरू झाले. सिडको, हडको, पुंडलिकनगर, जयभवानीनगर, ठाकरेनगरसह लगतच्या ७ ते ८ लाख नागरिकांच्या सुविधेसाठी हे रेल्वेस्टेशन सुरू करण्यात आले. पूर्वी या भागातील नागरिकांना मुख्य रेल्वेस्टेशन गाठण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता. रिक्षाचालक मनमानी भाडे आकारत असत. मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन सुरू झाल्यानंतर नागरिकांना सुविधा मिळाली; परंतु अपुऱ्या सोयी-सुविधांमुळे गैरसोयीला सामोरे जाण्याची वेळ नागरिकांवर आली.
या रेल्वेस्टेशनचा मार्च २०१५ मध्ये ‘डी’ दर्जाच्या स्टेशनमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ‘डी’ वर्गातील स्टेशनवर प्रवाशांसाठी आवश्यक असलेल्या सुविधा देण्यासाठी याठिकाणी सुरू असलेली बुकिंग कक्ष, वेटिंग हॉल, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सोय, आसनव्यवस्था, फुटपाथची लांबी व रूंदी वाढविण्यात आली. मात्र कोट्यावधी रूपये खर्च करून झालेल्या कामांचा उपयोग शुन्य आहे. परंतु त्यानंतर रेल्वेस्टेशनवर विकास कामे होताना कुठेही दिसत नाहीत. मुळात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याच मतदार संघात हे स्टेशन असताना ही अवस्था आहे. रेल्वे प्रशासनाकडून येथील विकास कामांसाठी सातत्याने जागेचे कारण सांगितले जात आहे. मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात वसाहती झाल्या आहेत. खासदार जलील यांच्या मागणीचा विचार झाल्यास आगामी काळात येथे एक्स्प्रेस रेल्वेना थांबा मिळाल्यास स्टेशनवर प्रवाशांची गर्दी वाढेल; परंतु जागेअभावी प्रवाशांच्या सुविधेसाठी वाहन पार्किंग, एटीएम, मोठे प्रतीक्षालय अशा सुविधा देण्यास अडचणींना सामोरे जावे लागणार असल्याचे दिसते.
येथील स्थानकावर तपोवन, नंदीग्राम, जनशताब्दी आदी एक्सप्रेस गाड्या थांबल्यास रेल्वेची जागा कमी आहे. त्यामुळे प्लॅटफॉर्म संपताच रेल्वेची जागा संपते. या परिस्थितीमुळे प्रवाशांची संख्या वाढल्यास टॅक्सी स्टँडसह अन्य सुविधा देण्यासाठी रेल्वेला आसपासच्या जागांचे भूसंपादन करणे गरजेचे आहे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींसह जिल्हा व महापालिका प्रशासनाने जबाबदारी घेणे गरजेचे आहे. सद्यःस्थितीत मुकुंदवाडी स्टेशनवर ४ ये-जा करणाऱ्या, १५ पॅसेंजर थांबतात. येथे दररोज सुमारे ५० ते ६० हजार रुपयांची तिकीट विक्री होते. केवळ मराठवाडा एक्स्प्रेसला थांबा आहे. जनशताब्दी एक्स्प्रेस, तपोवन एक्स्प्रेससह नंदीग्रामला व अन्य एक्स्प्रेसला थांबा दिल्यास प्रवाशांची संख्या वाढणार आहे. त्यादृष्टीने येथे मुलभुत सुविधांसह सुरक्षेची उपाययोजना करणे गरजेचे आहे.