तगादा : 70 एकरांत उभारलेल्या 'या' कृषी बीजगुणन केंद्राची दुरावस्था; निधीची गरज पण अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

Tagada
TagadaTendernama

यवतमाळ (yavatmal) : निंबाळा येथे 70 एकरमध्ये तालुका कृषी बीजगुणन केंद्र असून, दुर्लक्षतेमुळे व निधींच्या कमतरतेमुळे या कृषी बीजगुणन केंद्राची दुरवस्था झाली आहे. आता याठिकाणी फारसे बीजगुणन होत नसून अत्यंत अल्प उत्पादन होत आहे. त्यामुळे या केंद्रातून शेतकऱ्यांना मिळणारे प्रात्यक्षिक आणि अनेकांच्या हाताला मिळणारा रोजगारही बंद झाला आहे.

Tagada
तगादा : चांदपुरात 'त्या' 12 एकर जागेच्या हस्तांतरणासाठी का करावा लागतोय संघर्ष?

कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजना या मंडळामार्फत कार्यान्वित होतात. परिणामी वस्तुस्थिती बघता, येथे तालुका कृषी केंद्राच्या नूतनीकरणासाठी शासनाच्या निधीची आवश्यकता आहे. आता इमारती जीर्ण झाल्या आहेत, तर गोडावून दुर्लक्षित पडली आहेत. येथील 70 एकर शेतीच्या भूखंडामध्ये सिंचनाची व्यवस्था आहे. काही क्षेत्र पडीक आहे. यामुळे या भागात मोकाट जनावरे आणि वन्यप्राण्यांचा मोठा वावर असतो. यावर्षी 70 एकर क्षेत्रफळांपैकी 20 ते 25 एकर शेतीमध्ये पावसाळी सोयाबीन व तूर पिकांचे यावर्षी उत्पादन घेण्यात येऊन बीजोत्पादनासाठी महाबीज कंपनीला हा माल पाठविण्यात आला. मात्र, याठिकाणी अत्यंत अल्प उत्पादन काढले गेल्याची माहिती मिळाली. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या कृषी विभागाला उत्पन्नाची सरासरी राखता येत नसल्याने परिणामी कृषी विभागालाच कृषी धडे देण्याची गरज निर्माण झाली आहे. या बीजगुणन केंद्राकडे कृषी विभागाचे अधिकारी लक्ष देत नसल्याने या केंद्राची दुरवस्था झाली असल्याचे बोलले जात आहे. या केंद्रात पूर्वी कृषीसंदर्भात विविध उपक्रम राबवून शेतकऱ्यांना मार्गदर्शनासह प्रात्यक्षिक दाखविले जात होते. यातून मार्गदर्शन घेऊन शेतकरी तशा प्रकारे शेती करून उत्पादन वाढीचा प्रयत्न करीत होते.

Tagada
तगादा : साहेब, लोंढोली ते चिंचडोह या मुख्य रस्त्याचे डांबरीकरण का नाही होत?

मजुरांचा रोजगार बुडाला : 

पूर्वी या कृषी बीज केंद्रात होणाऱ्या कामातून स्थानिक मजुरांना रोजगार उपलब्ध होत असे. परंतु, केंद्राचे कामच जवळपास बंद असल्याने मजुरीची संधीही गेली आहे. या बीजगुणक क्षेत्राकडे आर्थिक स्रोत म्हणून पाहिल्यास वा 70 एकर क्षेत्रामध्ये उत्पन्नाचे अनेक स्रोत निर्माण होऊ शकतात. या बीजगुणन केंद्राकडे कृषी विभागाचे लक्ष नसल्याने आणि निधीच्या कमतरतेमुळे शेतीची आणि इथे असलेल्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. शेतीचे मोठे क्षेत्र पडीक आहे. संशोधन ठप्प पडले आहे. त्यामुळे या शासकीय जागेवर भविष्यात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होण्याची भीती आहे. कर्मचाऱ्याऱ्यांची संख्या अपुरी असल्याने या बीजगुणन केंद्रावरून पूर्ण क्षमतेने काम करणे कठीण जात आहे. कर्मचारी वाढवून या केंद्रावरून पूर्ण क्षमतेने काम करून विभागातील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. अशी माहिती महेश वैद्य, उपविभागीय कृषी अधिकारी, पांढरकवडा यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com