तगादा : बंदी असलेल्या प्लास्टिक कॅरीबॅगची औरंगाबादेत खुलेआम विक्री
औरंगाबाद (Aurangabad) : पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरीबॅगच्या वापरावर राज्यात बंदी असतानाही औरंगाबाद महापालिकेच्या (Aurangabad Municipal Corporation) हद्दीत खुलेआम विक्री होत असल्याचा आरोप औषध विक्रेत्याने केला आहे.
पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरीबॅग वापरावर औरंगाबाद महापालिका हद्दीत बंदी असतानाही शहरातील किराणा दुकानदार आणि भाजी विक्रेते सर्रासपणे ग्राहकाच्या हातात पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडी असलेल्या प्लास्टिक कॅरीबॅग टेकवत असल्याचे शहरातील औषध विक्रेते बद्रिनारायण तोष्णीवाल यांनी 'टेंडरनामा'शी बोलताना सांगितले.
महापालिकेने या बाबत सातत्याने कमी जाडीच्या कॅरीबॅगचा वापर करू नये, असे आवाहन ग्राहक आणि व्यापाऱ्यांना केले आहे. या कमी जाडीच्या प्लास्टिक बॅगचा वापर करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशाराही महापालिका प्रशासनाने दिला असताना त्याकडे मात्र कानाडोळा केला जात आहे. नियम मोडणाऱ्या शहरातील अशा विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी तोष्णीवाल यांनी केली आहे.

