
करत्नागिरी (Ratnagiri) : केंद्र सरकारच्या जलजीवन मिशनअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात ‘हर घर नल से जल’ अभियान राबविले जात आहे. यामध्ये १ हजार ४७५ गावांचा आराखडा तयार केला असून नळपाणी योजनेसाठी सुमारे साडेसातशे कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत; मात्र या योजनेचे काम कूर्म गतीने सुरू असून, ४६९ गावांच्या कामांना वर्कऑर्डर मिळाल्या आहेत. जागेच्या अभावासह अन्य विविध कारणांमुळे ७२ गावांनी योजना राबविण्यास नकार दिला आहे.
जिल्ह्यातील ८४५ ग्रामपंचायतींत ३ लाख ४७ हजार ९०० ग्राहक असून, आतापर्यंत विविध योजनांमधून १ लाख ७६ हजार ग्राहकांच्या घरात नळाद्वारे पाणी पुरवले जात आहे. उर्वरित सव्वादोन लाख ग्राहकांच्या घरात मार्च २०२४ पर्यंत नळाद्वारे पाणी देण्याचे उद्दिष्ट ‘हर घर नल से जल’ या महत्त्वाकांक्षी योजनेतून निश्चित केले आहे. त्यासाठी देशाच्या अंदाजपत्रकात पुरेशा निधीची तरतूद केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही महत्त्वाकांक्षी योजना असल्यामुळे जिल्हास्तरावर त्याचा आढावा घेतला जात आहे. जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून त्याची कसून अंमलबजावणी केली जात आहे. कोकणातील भौगोलिक क्षेत्राचा विचार करता अनेक गावांना पाणीपुरवठा करणे शक्य होत नाही. त्यासाठी प्रत्येक गावांचा आराखडा तयार करून पाणी पुरवठ्यासाठी बंधारे बांधणे, नवीन विहिरी उभारणे, पाऊस पाणी संकलन टाकीच्या माध्यमातूनही पाणी योजना राबविण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामधून प्रत्येक व्यक्तीला ५५ लिटर पाणी दिले जाईल.
जिल्ह्यात १ हजार ४७५ पाणी योजनांपैकी १ हजार २७४ योजनांचा प्रकल्प अहवाल तयार झाला आहे. ९०३ कामांची टेंडर प्रक्रिया सुरू असून, ४६९ योजनांना वर्कऑर्डरही दिली गेली आहे. १४ कामे पूर्ण झाली आहेत. पाच कोटींपेक्षा अधिक रकमेची अंदाजपत्रके असलेल्या योजनांची कामे जीवन प्राधिकरणामार्फत करण्यात येणार आहेत. बहुसंख्य योजना या दहा लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या असल्याने टेंडर प्रक्रिया जिल्हा परिषदस्तरावर केली जात आहे. टेंडर काढले तरीही कामे घेण्यासाठी येणाऱ्या ठेकेदारांची संख्या कमी आहे. त्यामुळे टेंडर वारंवार काढावे लागत आहे. जागांचा अभाव, गावामध्ये नकारात्मक भावना अशा कारणांमुळे ७२ गावांनी योजना राबविण्यास नकार दिला आहे. त्या ठिकाणी प्रशासनाला प्रचार, प्रसारासाठी नियोजन करावे लागणार आहे.