
नागपूर (Nagpur) : राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) म्हटले की, ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असेच चित्र आपल्या डोळ्यापुढे राहते. मात्र, एसटीची आणखी एक सेवा आहे, ती म्हणजे ‘महाकार्गो’ची. या सेवेमुळे तोट्यात असलेल्या एसटीला आर्थिक बळ मिळत असल्याने ती एसटीसाठी संजीवनी ठरत आहे.
बालभारती, महाबीज, एसीसी सिमेंट यासारख्या खासगी, तसेच सरकारी कार्यालयातील सामान नेण्यासाठी ‘महाकार्गो’चा मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागला आहे. ही सेवा स्वस्तात परवडणारी असल्याने मोठ्या कंपन्यांसह व्यापारी सुद्धा महाकार्गोला पसंती देत आहे. त्यामुळे मार्च ते जून या केवळ चार महिन्यांत एसटीने महाकार्गोतून २५ लाखांच्यावर उत्पन्न मिळविले आहे. महामंडळ एका प्रवाशासाठीसुद्धा एसटी गावात नेते. डिझेल व इतर खर्च वाढत असताना प्रवाशांच्या हितासाठी एसटीचा डोलारा उभा आहे. त्यामुळे एसटी तोट्यात असल्याची ओरड होत असताना अशा अतिरिक्त उत्पन्नातून एसटीला आर्थिक संजीवनी मिळते आहे.
महाकार्गोच्या सेवा
अन्नधान्याची वाहतूक, सिमेंट, टाइल्स, लोखंड व घरगुती सामानांची वाहतूक. एसीसी सिमेंट, बालभारती, महाबीज आदी कंपन्यांशी करार करून याद्वारे नियमित सामानांची बुकिंग सुरू आहे. एसटी महाकार्गोसाठी २०० कि.मी. पर्यंत ५७ रुपये प्रति कि.मी. तर २०१ कि.मीच्या पुढे ५५ रुपये प्रति कि.मी भाडे आकारते.