
नागपूर (Nagpur) : अतिवृष्टी व पुरामुळे नागपूर जिल्ह्यात (Nagpur District) शेतपिकांसह इतर आर्थिक हानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. रस्त्यांचेही मोठे नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे जिल्हा परिषद अंतर्गत येणारे ४५५ किमीचे रस्ते खराब झाले. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी १२८ कोटींची गरज असल्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडून शासनाकडे पाठविण्यात आला. २०१६ पासून अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी राज्य सरकारकडून अद्याप एक रुपयाही मिळालेला नाही. (Nagpur ZP - Nitin Gadkari)
जुलै व ऑगस्ट महिन्यात अनेकदा अतिवृष्टी झाली. अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आले. यामुळे जिल्ह्यात १ लाख १४ हजार हेक्टरमधील शेत पिकांचे नुकसान झाले. त्याच प्रमाणे अनेकांचा जीव गेला. पावसामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांचेही नुकसान झाले. जिल्हा परिषद अंतर्गत येणारे ४५५ किमीचे रस्ते खराब झाले. यातील १०८ किमीचे रस्ते हे इतर ग्रामीण रस्ते, तर ३४६ किमीचे ग्रामीण रस्ते आहेत.
हे रस्ते खराब झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना ये-जा करण्यास मोठी अडचण होत आहे. ते दुरुस्त न झाल्यास अधिक खराब होतील. या रस्त्यांची तात्पुर्ती दुरस्ती करण्यासाठी ३७ कोटी ६ लाखांची, तर कायम स्वरुपी दुरुस्ती करण्यासाठी १२८ कोटी ३१ लाखांची गरज आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला.
३६४ कोटी थकीत
दर वर्षी अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे नुकसान होत आहे. परंतु शासनाकडून निधीच मिळत नाही. २०१६ ते १०२१ काळात रस्ते दुरुस्तीसाठी ३६४ कोटींच्या मागणीचे प्रस्ताव शासन स्तरावर पाठविण्यात आले. परंतु एकही रुपया शासनाकडून देण्यात आला नाही.