
मुंबई (Mumbai) : आरोग्य विभागाने (Public Health Department) आठ कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनची (cancer diagnostics van) खरेदी केली असून, या व्यवहारात घोटाळा झाला असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी करत खळबळ उडवून दिली. पावसाळी अधिवेशन संपण्यापूर्वी या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सभागृहासमोर मांडावी अशी मागणीही त्यांनी केली.
दुप्पट तिप्पट दराने खरेदी
सार्वजनिक आरोग्य विभागाने (Public Health Department) कॅन्सरचे निदान करण्यासाठी आठ कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनची खरेदी करण्यात आली आहे. पण या व्हॅन दुप्पट तिप्पट दराने खरेदी करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात गैरव्यवहार झाला आहे, याची चौकशी होऊन अधिवेशन संपण्याच्या आत त्याचा अहवाल सभागृह समोर मांडावा अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
नेमके काय सुरू आहे?
राज्य सरकारने आठ कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनची खरेदी केली. एका व्हॅनची किंमत चाळीस लाखाच्या वर होऊ शकत नाही. या व्हॅन मधील यंत्रे ही बारा लाखाच्या किंमतीपेक्षा अधिक नाहीत. असे असताना वाहने खरेदी करताना अधिकच्या किंमतीने घेण्यात आली आहेत. कॅन्सर सारखा जीवघेणा आजार आहे, त्याच्याशी संबंधित व्हॅन आहेत, त्यातील काही यंत्रे बंद पण पडली आहेत. या खरेदीत भ्रष्टाचार झाला असून, याबाबत चौकशी सुरू आहे. अजून अहवाल देखील आला नाही, मग नेमके काय सुरू आहे? असा सवाल विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
अध्यक्षांनी काय दिले आदेश?
अधिवेशन संपण्याच्या आत हा अहवाल सभागृह समोर मांडला पाहिजे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. यावर अध्यक्षांनी या प्रकरणाची चौकशी अधिवेशन संपण्याच्या आत पूर्ण करून अहवाल सदनासमोर मांडण्याचे निर्देश दिले. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून ८ कर्करोग मोबाईल व्हॅन ८ कोटी रुपये खर्च करून खरेदी करण्यात आल्या आहेत.
या कर्करोग व्हॅन पुणे, ठाणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अकोला, कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्याच्या आरोग्य उप संचालक कार्यालयात दाखल झाल्या आहेत. व्हॅनमध्ये एसी तपासणी कक्ष आहे. स्तन, गर्भाशयाच्या कर्करोगाची तपासणीसाठी लागणारे कोल्पोस्कोप यंत्र आहे. तसेच मुख कर्करोगाची तपासणीसाठी डेंटल चेअर आहे.