सुविधांअभावी त्याच 'ढोलेरा'तून पळाले ५ मोठे प्रकल्प;आता वेदांताचा?

Dholera Smart City
Dholera Smart CityTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : वेदांता फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. मात्र गुजरातच्या ढोलेरा येथे पायाभूत सुविधांची वानवा असल्याने तेथून याआधी सुद्धा अनेक मोठ्या प्रकल्पांनी काढता पाय घेतला असल्याने वेदांता फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्पाचीही गुजरातमध्ये कोंडी होणार असल्याची माहिती आहे. पायाभूत सुविधांअभावी ढोलेरातून आतापर्यंत आयएसएमसी डिजिटल, जिओफोन, लॉकहीड मार्टीन कॉर्पोरेशन, एचडीसी, जीएसपीसी हे पाच मोठे प्रकल्प पळ काढला आहे. केंद्र सरकारच्या अट्टाहासाने वेदांन्ता फॉक्सकॉन प्रकल्पही अडचणीत येण्याची किंवा प्रदीर्घ काळ रखडण्याची शक्यता आहे, अशी उद्योग जगतात चर्चा आहे.

Dholera Smart City
शिंदे-फडणवीस सरकारमुळे १५३ नवउद्योजक प्रतीक्षेत; हजारो रोजगार..

वेदांता कंपनीने तळेगाव व ढोलेरा या दोन्ही स्थळांचा तुलनात्मक अभ्यास केला होता. कंपनीच्या अंतर्गत अहवालानुसार ढोलेरा येथे पाण्याची व कुशल कामगारांची कमतरता, इलेक्ट्रॉनिक्स इकोसिस्टिम नसणे, दुय्यम उत्पादकांची कमतरता व दलदलयुक्त जमीन अशी अनेक कारणे देऊन नापसंती व्यक्त केली होती. महाराष्ट्रातील तळेगाव हीच या प्रकल्पासाठी सुयोग्य जागा होती. या करिता महाराष्ट्राने गुजरातपेक्षा अधिक भांडवली अनुदानासहित अनेक सवलती देऊनही आयत्या वेळी हा प्रकल्प ढोलेरा येथे नेण्याचा निर्णय केवळ केंद्र सरकारच्या दबावाखाली झाला असल्याचा आरोप आहे. १० बिलियन डॉलर गुंतवणुकीच्या सेमीकंडक्टर उत्पादनासाठी देशात वेदांता फॉक्सकॉन सहित तीन कंपन्यांनी अर्ज केला. त्यातील आयएसएमसी डिजिटल (ISMC Digital) ही कंपनी ढोलेराला येणार होती‌. या कंपनीबरोबर गुजरात सरकारचा सामंजस्य करारही झाला होता. आता कंपनीने सुविधा व पाण्याच्या कमतरतेमुळे ढोलेरातून पळ काढला आहे.

Dholera Smart City
'या' वादग्रस्त कंपनीवर शिंदे-फडणवीस मेहरबान का? २० कोटींच्या...

जिओफोन हा प्रकल्प ढोलेरा सोडून तिरुपतीला गेला. या अगोदर लॉकहीड मार्टीन कॉर्पोरेशन या कंपनीने सोलार बॅटरी प्रकल्पातून ढोलेरामधून माघार घेतली. त्यानंतर पायाभूत सुविधांअभावी एचडीसी (HDC) प्रकल्पाने ढोलेरा येथून काढता पाय घेतला. यामुळे केंद्र सरकारच्या अट्टाहासाने वेदांन्ता फॉक्सकॉन प्रकल्पही अडचणीत येण्याची किंवा प्रदीर्घ काळ रखडण्याची शक्यता आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी गुजरात राज्यात अनेक अव्यवहार्य प्रकल्प घोषित करुन हजारो करोड पाण्यात घातले, असा आरोप काँग्रेसने केला आहे. गुजरात मध्ये असाच गिफ्ट सिटी प्रकल्प रखडला होता. पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र तिथे नेले. गॅसचे साठे मिळाले असे दाखवून जीएसपीसी (GSPC) ला १० हजार कोटीचे रोखे घेण्यास भाग पाडले गेले. पुढे गॅसच नाही हे स्पष्ट झाल्यानंतर कर्जबाजारी झालेल्या या कंपनीला केंद्रात सत्ता आल्यानंतर ओएनजीसीला विकत घेण्यास भाग पाडले गेले.

२०१४ पासून केंद्रात भाजपची सत्ता आल्यापासून महाराष्ट्र आणि मुबईतील प्रकल्प आणि उद्योग पळविण्याची परंपरा कायम असल्याचे दिसून येते. यामागे महाराष्ट्र आणि मुंबईचे महत्व कमी करण्याचा भाजपचा अजेंडा असल्याची टीका काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून करण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यातील अंदाजे आठ मोठे प्रकल्प गुजरात आणि दिल्लीत हलविण्यात आल्याची माहिती असून कोकणातील रिफायनरी प्रकल्पही अन्य राज्यात जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Dholera Smart City
शिंदे सरकारकडून आता अधिवेशनाचेही खासगीकरण;विधिमंडळातही ठेकेदारांची

पायाभूत सुविधांअभावी ढोलेरातून पळालेले प्रकल्प :
१) आयएसएमसी डिजिटल
२) जिओफोन
३) लॉकहीड मार्टीन कॉर्पोरेशन
४) एचडीसी
५) जीएसपीसी

महाराष्ट्राबाहेर गेलेले प्रकल्प :
१) तळेगाव येथे होणारा वेदांता फॉकस्कॉन : १ लाख ६९ हजार कोटींची गुंतवणूक - गुजरात
२) रायगडमधील बल्क ड्रग पार्क प्रकल्प :  80 हजार कोटी गुंतवणूक - गुजरात
३) महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र - गुजरात
४) नागपूर येथील राष्ट्रीय कामगार शिक्षण मंडळ - गुजरात
५) जहाज तोडण्याचा उद्योग - गुजरात
६) पालघरमधील सागरी पोलिस अकादमी - गुजरात
७) एअर इंडिया मुख्यालय - दिल्ली
८) ट्रेडमार्क पेटंट कार्यालय - दिल्ली
९) कोकणातील रिफायनरी प्रकल्प बाहेर जाण्याची शक्यता : ३.५० लाख कोटींची गुंतवणूक

वेदांता फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातच्या ढोलेराला नेण्याने केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचेही नुकसान होणार आहे. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांचे अपयश पंतप्रधान म्हणून ते आता निस्तरत आहेत. आजवर ढोलेरामधून अनेक कंपन्यांनी काढता पाय घेतला आहे.

- सचिन सावंत, काँग्रेस प्रदेश सरचिटणीस

वेदांता-फॉक्सकॉनच्या संलग्न प्रकल्पासाठी अगरवाल यांनी महाराष्ट्राची निवड करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार! महाराष्ट्रात गुंतवणूक यावी यासाठी आम्ही कायमच स्पर्धात्मक आणि व्यवसायपूरक राहू. परंतु मला खेद होतो की केवळ राजकीय स्वार्थीपणासाठी अतिशय चुकीचे, नकारात्मक आणि निराधार दावे केले जात आहेत. पण असे करून ते केवळ त्यांच्या अकार्यक्षमतेचेच प्रदर्शन करीत आहेत. माझा या नेत्यांना प्रश्न आहे की, महाराष्ट्रात 3.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक रिफायनरीच्या माध्यमातून येत असताना त्याला विरोध कुणी केला, हा प्रकल्प कुणी लांबविला? स्वतः कार्यक्षम होण्यावर आधी लक्ष केंद्रीत करा, ना की अस्वस्थता आणि नकारात्मकतेवर !

- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

वेदांता-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर हा प्रकल्प गुजरातमध्ये नेण्याचा निर्णय आधीच घेतला आहे. जुलै महिन्यात महाराष्ट्र सरकारने कसोशीने प्रयत्न केले होते, परंतु आम्हाला गुजरात पसंत पडले आहे.

- अनिल अग्रवाल, वेदांता ग्रुपचे अध्यक्ष

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com