
मुंबई (Mumbai): ग्रामीण भागात प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून रस्त्यांचे जळे निर्माण करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील रस्ते टिकाऊ होण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून होणारे रस्ते यापुढे सिमेंट काँक्रिटचे करण्यात येणार आहेत, अशी माहिती ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण रस्त्यांबाबत सदस्य शिवाजी पाटील यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत सदस्य हरीश पिंपळे यांनीही उपप्रश्न विचारत सहभाग घेतला.
मंत्री गोरे म्हणाले, ग्रामीण रस्त्यांची रुंदी सध्या ५, ३ आणि ३.५ मीटर आहे. आवश्यकते प्रमाणे या रस्त्यांची रुंदी वाढविण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. तसेच जिल्हा परिषदेकडील रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरण करण्याबाबत प्रस्ताव आल्यास तो तपासून निर्णय घेण्यात येईल. राज्यात मागील काळात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत राज्याच्या इतिहासात सर्वात जास्त ग्रामीण रस्त्यांची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये ११ हजार ६९७ कामे मंजूर करण्यात आली आहेत, याची लांबी ४६ हजार १०६ किलोमीटर आहे.
ग्रामीण भागात पांदण रस्ते निर्मितीसाठी ग्रामविकास विभागाच्यावतीने प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. हा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर जाणार आहे. यामधून बऱ्याच योजनाबाह्य ग्रामीण रस्त्यांची निर्मिती पांदण रस्त्यांच्या माध्यमातून होणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड विधानसभा मतदारसंघात १२० किलोमीटर लांबीचे रस्ते सन २०२३- २४ व २०२४- २५ मध्ये दुरुस्त करण्यात आले आहेत. तसेच प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत या भागात ५३.८६ किलोमीटर लांबीचे रस्ते मंजूर असून त्यापैकी ४५.९२ किलोमीटर लांबीचे रस्ते पूर्ण करण्यात आले आहेत. तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत १६२.९५ किलोमीटर लांबीचे रस्ते मंजूर करण्यात आले, त्यापैकी १०६.५१ किलोमीटर लांबीचे रस्ते पूर्ण करण्यात आली आहेत, असेही ग्रामविकास मंत्री गोरे यांनी यावेळी सांगितले.