
पुणे (Pune) : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) हाती घेतलेल्या पश्चिम रिंगरोडच्या (West Ring Road) भूसंपादनाला या महिन्याच्या अखेरपर्यंत सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यासाठी आवश्यक तो निधी महसूल खात्याकडे जमा झाला आहे. त्यामुळे या रस्त्याच्या कामासाठी स्वखुशीने जागा देणाऱ्यांना निश्चित केलेल्या मूल्यांकनाच्या २५ टक्के जादा रक्कम दिली जाणार आहे, त्यामुळे रिंगरोड मार्गी लागण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल पुढे पडणार आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी या रिंगरोडचे काम ‘एमएसआरडीसी’ने हाती घेतले आहे. या रिंगरोडचे पूर्व व पश्चिम, असे दोन टप्पे आहेत. पूर्व रिंगरोड उर्से (ता. मावळ)-केळवडे (ता. भोर) असा आहे, तर पश्चिम रिंगरोडला केळवडेपासून (ता. भोर) सुरुवात होणार असून हवेली, मुळशी आणि मावळ येथील उर्से टोलनाका येथे एकत्र येणार आहे. रिंगरोड हा ३७ गावांमधून जाणार आहे. यातील ३६ गावांतील जमीन मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. रिंगरोडच्या भूसंपादनासाठी राज्य सरकारकडून पुरवणी अंदाजपत्रकात दीड हजार कोटींची तरतूद करण्यात आली. हा निधी तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी ‘एमएसआरडीसी’कडे वर्ग केला. मात्र, ‘एमएसआरडीसी’ने हा निधी भूसंपादनासाठी संबंधित भूसंपादन अधिकाऱ्यांकडे तांत्रिक कारणांमुळे वर्ग केला होता. त्यामुळे मोजणीची प्रक्रिया तसेच प्राथमिक मूल्यांकन दर निश्चित करूनही भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करता येत नव्हती.
दरम्यान, ही तांत्रिक प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे. हा निधी १५ ऑगस्टनंतर महसूल खात्याला उपलब्ध करून दिला जाणार आहे. निधी उपलब्ध झाल्यानंतर भूसंपादन करण्यात येणाऱ्या जमिनी मालकांना त्यांचे वाटप सुरू करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या कायद्यानुसार जागा मालकांना चौपट दर निश्चित केला आहे. भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर जे जागा मालक स्वत:हून जमिनी देतील, त्यांना अतिरिक्त २५ टक्के निधी देण्यात येणार आहे, असे जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
- पूर्व रिंगरोड
उर्से (ता. मावळ) ते केळवडे (ता. भोर)
- पश्चिम रिंगरोड
केळवडेपासून (ता. भोर) हवेली, मुळशी आणि मावळ येथील उर्से टोलनाका येथे एकत्र येणार
जागा मालकांना काय फायदा?
- भूसंपादीत जमिनींना चौपट मोबदला मिळणार
- जागा मालकांनी स्वत:हून जमिनी दिल्यास २५ टक्के अधिक मोबदला
- गावातून रिंगरोड जाणार असल्यामुळे जागांच्या किमती वाढणार
- आजूबाजूच्या परिसरात नियोजनबद्ध विकास होणार
रिंगरोड दृष्टिक्षेपात
- पश्चिम भागातील भोर, हवेली, मुळशी, मावळ या चार तालुक्यातील रिंगरोड गावातून जाणार
- ६९५ हेक्टर जमिनीचे भूसंपादन
- रिंगरोडच्या मोजणीचे काम पूर्ण
- भूसंपादनाचे दर निश्चित करण्याचे काम अंतिम टप्प्यात
- समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर भूसंपादन करणार