
पुणे (Pune) : बंगळूर-मुंबई बाह्यवळण महामार्गावर कात्रज नवीन बोगदा ते नवले पुलादरम्यान अवघ्या दोन वर्षांत तब्बल ५६ अपघात झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (NHAI) जाग आली आहे. तीव्र उतार कमी करून समांतर रस्त्यांसाठी उपाययोजना करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, या रस्त्यावरील अपूर्ण अवस्थेतील सेवा रस्ते, अतिक्रमणे दूर केव्हा होणार, याबाबत प्रश्नचिन्ह आहेच.
बंगळूर-मुंबई बाह्यवळण महामार्गाभोवती मोठ्या प्रमाणावर नागरिकरण झाले आहे. मात्र, कात्रज नव्या बोगद्यापासून नवले पुलापर्यंत रस्त्याचा तीव्र उतार अनेकदा अपघातांना कारणीभूत ठरत आहे. तसेच, सेवा रस्त्यांची सलगता नसल्यामुळे हलकी वाहनेही मुख्य रस्त्यावर येतात. त्यातूनही अनेकदा अपघात होत आहेत. त्यातच या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात जड वाहतूक होते. नागरिकरणामुळे येथील महामार्गावर वाहनांची कायमच गर्दी असते. या रस्त्यावर रविवारी रात्री झालेल्या अपघातात नियंत्रण सुटलेल्या ट्रकची तब्बल २६ वाहनांना धडक बसली. त्यामुळे या महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दुर्दैवाने स्थानिक लोकप्रतिनिधींकडूनही याबाबत फारसा पाठपुरावा होत नाही.
सेवा रस्त्याच्या दुतर्फा टपऱ्या, दुकाने, पार्किंग, तसेच मोठ्या प्रमाणात होर्डिंग उभारण्यात आले आहेत. तसेच महामार्गावर अनेक ठिकाणी पंक्चर असल्याने अनेक वाहनचालक उलट्या दिशेने जा-ये करतात. यामुळे अपघात वाढताना दिसत आहे. अनेक ठिकाणी महामार्गावर अनधिकृत थांबे तयार झाले आहे. यावर पोलिसांचे नियंत्रण असणे गरजेचे आहे.
दरी पूल ते नवले पुलादरम्यानची वाहतूक सुरळीत करण्याच्या दृष्टीने येत्या काळात स्थानिक आणि महामार्ग वाहतूक स्वतंत्र करण्यात येणार आहे. स्वामी नारायण मंदिर ते नवले पुलादरम्यान असलेल्या रस्त्यावरील उतार कमी करण्याच्या दृष्टीने एक समांतर रस्ता करण्याचे नियोजन आहे. त्याचा प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला आहे. तसेच, दरी पुलाजवळ चेक पोस्ट तयार करणार आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण निश्चित कमी होईल.
- संजय कदम, मुख्य प्रकल्प अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
पोलिस आणि ‘आरटीओ’कडून महामार्गाबाबत सूचना मागविल्या आहेत. त्यानुसार महामार्गाचे काम करण्यात येईल. तसेच आमच्याकडून देखील यासाठी लागणारे तांत्रिक सहकार्य केले जाईल. तातडीने कामाला सुरवात करू.
- अमित भाटिया, विभागीय प्रमुख, रिलायन्स इन्फ्रा
हा अपघात चालकाच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचे दिसून आले आहेत. तसेच, चालकांनी देखील वाहने जबाबदारीने चालवावीत. महामार्गाच्या नियमांचे पालन करावे.
- शैलेश संखे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सिंहगड पोलिस ठाणे