
पुणे (Pune) : फुरसुंगी आणि उरुळी देवाचीमधील मुख्यमंत्री पेयजल योजनेला राज्य सरकारने २४ कोटी निधी उपलब्ध करून दिल्याने ही योजना आता पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे लवकरच ही गावे टँकरमुक्तीकडे वाटचाल करीत आहेत.
कचरा डेपो बाधित गावात पाण्याचा नैसर्गिक स्रोत खराब होत असल्याने योजनेची आखणी केली. चार वर्षांपूर्वी कामाला सुरवात झाली. या काळात दोन वेळेस सत्ता बदल झाला. दरम्यान महाराष्ट्र प्राधिकरण विभागाला आवश्यक निधी उपलब्ध होण्यात अडचणी निर्माण झाल्याने कामे संथ गतीने होत होती. करोना काळात कामगारवर्गाअभावी काम बंद ठेवावे लागले. त्यामुळे ७२ कोटींची योजना महागाईमुळे आणि नवीन लागू झालेल्या जीएसटीमुळे ८६ कोटींवर पोहोचली आहे. योजना पूर्ण झाल्यानंतर महापालिकेकडे ती हस्तांतर करण्यात येईल.
उरुळी देवाची येथे ५ साठवणूक टाक्या आहेत. त्यातील ३ पूर्ण आहेत आणि २ टाक्यांची कामे ४० टक्के झाले आहे. फुरसुंगीत सहा टाक्या आहेत, त्यातील २ बैठ्या, ४ उंच टाक्या आहेत. बैठ्या टाक्या पूर्ण आहेत, उंच टाक्यांपैकी ३ टाक्यांचे काम चाळीस टक्के पूर्ण आहे. एक टाकी जागा ताब्यात घेण्याअभावी प्रलंबित आहे. या टाक्यांना पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचे काम ९५ टक्के झाले आहे.
दोन्ही गावांची मिळून ६७ किमीची पाणी वितरण व्यवस्था आहे. त्यातील राहिलेले ३० किमीचे काम या निधीतून करण्यात येणार आहे. तोपर्यंत जुन्या वितरण व्यवस्थेच्या आधारे नळधारकांना पाणी देण्याची व्यवस्था आहे. टाक्यांची कामे पूर्ण करून दहा महिन्यात योजनेचे काम पूर्ण करणार आहोत.
- पांडुरंग गोसावी, शाखा अभियंता