
पुणे (Pune) : वाहतूक पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन करीत ऐन रहदारीच्यावेळी शहरातून ये-जा करणाऱ्या अवजड वाहनांवर वाहतूक शाखेने बडगा उगारण्यास सुरवात केली. चतुःशृंगी व डेक्कन वाहतूक विभागाने दोन दिवसांत ८० हून अधिक अवजड वाहनांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. परिणामी, पुणे शहरात अवजड वाहतूक काही प्रमाणात घटल्याचे चित्र दिसू लागले आहे.
काही महिन्यांपासून कर्वे रस्ता, जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, लाल बहादूर शास्त्री रस्ता अशा रहदारीच्या रस्त्यांवरून सिमेंटची वाहतूक करणारे मिक्सर, राडारोडा घेऊन जाणारे डंपर, ट्रक, मोठे टेम्पो अशा वाहनांची वाहतूक सुरू होती. त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडीमध्येही भर पडण्याबरोबच अपघाताच्या घटनाही घडत होत्या.
कर्वे रस्त्यावरील रसशाळा चौकात १० ऑक्टोबर रोजी झालेल्या अपघातात सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रकवर (मिक्सर) दुचाकी आदळून दोन तरुणांना जीव गमवावा लागला. गेल्या १० महिन्यांत अवजड वाहनांमुळे झालेल्या अपघातात तब्बल ८३ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर वाहतूक शाखेने अवजड वाहनांना आळा घालण्यासाठी त्यांना वेळेची मर्यादा दिली होती. त्यानंतरही संबंधित वाहनचालकांकडून वाहतूक शाखेच्या आदेशालाच हरताळ फासत शहरातून सर्रासपणे ये-जा सुरू ठेवली होती.
चतुःशृंगी वाहतूक शाखेने मागील आठवड्यात दोन दिवसात ७० हून अधिक अवजड वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला. संबंधित वाहने बाणेर, औंध येथून शहरामध्ये प्रवेश करून मध्यवर्ती भागातून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. तसेच, डेक्कन वाहतूक विभागाने ९ ते १० अवजड वाहनांवर कारवाई केली. अवजड वाहतुकीवर गुरुवारपासून कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे शुक्रवारपासून संबंधित वाहनांचे शहरामधून प्रवास करण्याचे प्रमाण घटले आहे. अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी व अपघातांच्या घटना घडतात.
- बाळासाहेब कोळी, पोलिस निरीक्षक, चतुःशृंगी वाहतूक शाखा