
पुणे (Pune) : बाणेर रस्त्यावर मेट्रोच्या कामासाठी दुभाजक काढून टाकले आहेत, रस्ता खोदलेला आहे. अशीच स्थिती सिंहगड रस्त्यावर उड्डाणपुलाच्या कामासाठी असताना दुसरीकडे मात्र, बाणेर व सिंहगड रस्त्यावर रस्ता, दुभाजक सुशोभीकरणासाठी ५० लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. या टेंडरला स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणातर्फे (PMRDA) शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोचे काम हाती घेण्यात आले आहे. ही मेट्रो गणेशखिंड रस्ता, बाणेर रस्ता, बालेवाडी या मार्गे हिंजवडीला जाणार आहे. मेट्रोच्या कामासाठी बाणेर रस्त्यावर रस्त्याच्या मध्यभागी बॅरिकेडिंग करून काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे तेथील दुभाजक काढून टाकले आहेत. तसेच मेट्रोच्या कामामुळे येथील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. अशी स्थिती असतानाही पथ विभागाने बाणेर रस्ता सुशोभीकरणाचे टेंडर काढले, त्यासाठी ६ ठेकेदारांनी तयारी दर्शविली होती. त्यापैकी मे. अतुल मानकर यांनी सर्वांत कमी रकमेची व सर्व खर्च मिळून २८.४८ लाख रुपयांचे टेंडर मंजूर करण्यात आली आहे. यामध्ये दुभाजकाचे रंगकाम करणे, पेडेस्ट्रीयन क्रॉसिंग,थर्मोप्लास्टिक पेंटिंग, साइन बोर्ड कर्ब स्टोन दुरुस्ती व पेटिंग व रस्ते देखभाल दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत.
सिंहगड रस्त्यावर राजाराम पूल ते वडगाव या दरम्यान उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. याठिकाणचे दुभाजक काढले आहेत, पादचारी मार्गाची रुंदी कमी केली आहे. तरीही या रस्त्याच्या सुशोभीकरणासाठी टेंडर मागवले. त्यात सात जणांनी टेंडर भरले. मे. रमेश मनोहर गुंड यांची सर्वांत कमी रकमेची २७ लाख २७ हजार रुपयांचे टेंडर मान्य केले आहे. पण सुमारे दोन किलोमीटरचे दुभाजक काढले असून, तेथे उड्डाणपुलाचे काम प्रगतिपथावर असताना सुशोभीकरण कसे करणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान याबाबत पथ विभागाचे अधिकारी म्हणाले की, केवळ दुभाजक काढला आहे, पण पादचारी मार्ग व चौकासह इतर ठिकाणी दुरुस्ती व रंगकाम करण्यात येणार आहे.