1991च्या विकास आराखड्यातील 'हा' रस्ता 31 वर्षांपासून कागदावरच का?

Aurangabad
AurangabadTendernama

औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबादकरांना सहा हजार कोटीतून मेट्रो रेल्वे आणि जालना रोडवर अखंडीत उड्डाणपुलाचे स्वप्न दाखवणाऱ्या लोकप्रतिनिधी, मनपा प्रशासक, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि पोलिस आयुक्त हे सर्व गावातील वाहतूक व्यवस्थेचा कसा बट्ट्याबोळ झाला याचा अनुभव स्वतः घेत आहेत. मात्र कोंडी कमी करण्यासाठी कुठल्याही पर्यायी उपाययोजना केल्या जात नाहीत, ही औरंगाबादकरांची शोकांतिका आहे.

Aurangabad
‘नमामी गोदा’ रेंगाळण्यास जबाबदार कोण?; फाईल वर्षभरापासून पडून

वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी जालनारोड ते बीडबायपासला जोडणारा झेंडाचौक ते विश्रांतीनगर रिंगरोडचे भिजत घोंगडे उठवावे, जालना रोडला समांतर असलेल्या एमजीएम ते लक्ष्मणचावडी रस्त्याचे रखडलेले रुंदीकरण करावे, बायजीपुरा भागातील मदनी चौक ते खास गेट ते राजाबाजार - कासारीबाजार, किराडपुरा ते रोशनगेट - चंपाचौक ते जुनाबाजार या रस्त्याचे रखडलेले रुंदीकरण पूर्ण करावे आदी उपाय सुचवले. या अभ्यासपूर्ण बातम्यांवर औरंगाबादकरांनी शिक्कामोर्तब देखील केले. या रस्त्यांचे काम झाले तर जालना रोडची कोंडी फोडणे सहज शक्य आहे. शहरातील रस्ते अरूंद असल्याने अनेकांना जालना रोड वरून प्रवास करण्याची वेळ येते. एकाच रस्त्यावर वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे. त्यातच १९९१च्या विकास आराखड्यातील कागदावर दिसणारा जालना रोड - भवानीनगर  - चंपा चौक - ते  दमडी महल या अडीच किलोमीटर लांबीचा नियोजित रस्ता देखील गत ३१ वर्षापासून कागदावर आहे.

Aurangabad
नागपुरात कचऱ्यातून उर्जेसह बायो सीएनजी, बायोगॅस, खते तयार करणार

तत्कालीन मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी २०१६ मध्ये या ३० मीटर रुंद रस्त्याला अडसर ठरणाऱ्या एकाच्या मालमत्तेसह ऐतिहासिक दमडी महलची पाडापाडी सुरू केली होती. पुढे पुलाचे काम देखील केले. त्यामुळे बकोरियांचे प्रयत्न पाहून लवकरच हा रस्ता पूर्ण होईल, अशी औरंगाबादकरांनी अपेक्षा व्यक्त केली होती. प्रत्यक्षात हा रस्ता रुंद करून जालना रोडला जोडणे हे मोठे आव्हान बकोरियांची बदली झाल्यानंतर आलेल्या आयुक्तांना जमले नाही. तत्कालीन मनपा आयुक्त डाॅ. पुरूषोत्तम भापकर यांच्यानंतर तब्बल चार वर्षानंतर बकोरियांनी प्रशासनाला सोबत घेऊन एक मिशन म्हणून रस्ते रुंदीकरणाची मोहीम हाती घेतली होती. त्यात सर्वप्रथम या रस्त्यापासून सुरूवात केली होती. मात्र त्यांची बदली होताच मोहीम थंडावली.

काय आहे अडचण?

जालना रोडला उत्तर - दक्षिण जोडणारा हा रस्ता दमडी महल ते चंपा चौकापर्यंत विकास आराखड्यानुसार ३० मीटर रुंद असला तरी पुढे चंपाचौक - निजामगंज, जुनामोंढा - भवानीनगर ते जालना रोड या एक कि.मी. अंतरात जवळपास रस्त्याच्या मधोमध साडेसहाशे बांधकामे झाली आहेत. या बांधकामांचा अडथळा दूर केला तर दमडी महल ते थेट जालना रोड पर्यंत वाय आकाराचा रस्ता तयार होऊन जिल्हाधिकारी कार्यालय तसेच टीव्ही सेंटर व जुन्या शहरातील अनेकांना येथून जालना रस्त्यावर येणे सुखकर होणार आहे.

औरंगाबाद मनपा आयुक्तपदाची धुरा हाती घेताच बकोरियांनी शहरातील वाहतूक कोंडी अनुभवली. त्यावर तोडगा काढण्यासाठी शहर विकास आराखड्याचा अभ्यास केला. त्यात दमडी महल ते जालना रोड हा १९९१च्या विकास आराखड्यात ३० मीटर रुंदीचा रस्ता कागदावर असल्याचे दिसताच त्यांनी प्रत्यक्ष अंमलबजावनीला सुरूवात केली. दमडी महलच्या परिसरातील  झाडे तोडली. थेट रस्त्याला बाधीत ठरणाऱ्या बांधकामांवर मार्कींग देखील केली. बकोरियांचे धाडस पाहून आता हा रस्ता होणार म्हणून शहरभर चर्चा सुरू झाली होती.  बकोरिंयांच्या धाडसाचे शहरभर कौतुक झाले. पुढे या रस्त्यावर पुलाचे बांधकाम देखील केले. मात्र दरम्यानच्या काळात बकोरियांची बदली झाली. बांधकामे तोडून रस्ता तयार करण्यासाठी नंतर आलेल्या कोणत्याही आयुक्तांनी धाडस केले नाही. 

Aurangabad
...तर रस्त्यांवरील खड्ड्यांना कंत्राटदार, अधिकाऱ्यांची नावे देणार!

आज जिल्हाधिकारी कार्यालयापासून आकाशवाणीपर्यंत जायचे असेल तर दोन पर्याय आहेत. एक तर शहागंज, मोंढा आणि पुढे आकाशवाणी असे साडेतीन किलोमीटरचे अंतर पार करावे लागते. दुचाकीस्वार चंपा चौकातून पुढे जाफर गेट येथून आकाशवाणीकडे जातात. त्यांना साधारण तीन किलोमीटर अंतर पार करावे लागते. मोठे वाहन असल्यास टीव्ही सेंटर, सेव्हन हिल असे वळण घेत आकाशवाणी येथे पोहोचता येते. त्यासाठी आठ ते दहा  किलोमीटर अंतर पार करावे लागते, परंतु हा रस्ता झाला असता तर अडीच किलोमीटर अंतर सर्व वाहनांना पार करावे लागले असते. यामुळे सर्वांचाच वेळ आणि इंधनात बचत झाली असती. सद्य:स्थितीत  पर्याय असलेल्या इतर रस्त्यांवर कमालीची वर्दळ कमी होऊन वाहतुकीची कोंडी कमी झाली असती. 

तत्कालीन आयुक्त भापकरांना अपयश

यापूर्वी तत्कालीन मनपा आयुक्त डाॅ. पुरूषोत्तम भापकर यांनी विकास आराखड्यातील या ३० मीटर रुंद आणि अडीच कि.मी. रस्त्याचा श्वास मोकळा करण्यासाठी २०१२ मध्ये मोठे धाडस दाखवले होते. रस्त्याच्या मधोमध इमारतींवर तीन वेळा मार्कींग केले होते. मात्र तेव्हा देखील भूसंपादनाचा मोठा पेच निर्माण करत तर कधी भापकरांवर राजकीय दबाब आणत माघार घ्यायला भाग पाडले होते. 

१९९१च्या विकास आराखड्यात टीव्ही सेंटरकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पंचायत समिती येथून या रस्त्याकडे वळण दाखवलेले आहे. दुसरीकडे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून गणेश काॅलनी - सलीम अली सरोवराकडून टीव्ही सेंटरकडे जाणारा रस्ता देखील या रस्त्याला जोडला आहे. हे दोन रस्ते वाय आकारात या रस्त्याला जोडले आहेत. पुढे हा रस्ता थेट फाजलपूरा - चंपाचौक - निजामगंज - जुनामोंढा - भवानीनगर मधून जालना रस्त्याला जोडलेला आहे. 

Aurangabad
मुंबईच्या अर्थव्यवस्थेला मोठा बूस्टर; BKC सारखी आणखी ८ इकॉनॉमिक हब

१९९१मध्ये विकास आराखड्यात हा रस्ता टाकण्यापूर्वीच येथील बांधकामे जुनी असल्याचा दावा मनपा अधिकारी करत आहेत. मात्र येथे कोणतेही अधिकृत रेखांकन नाही. येथील नागरिकांनी साध्या शंभर रुपयांच्या मुद्रांकावर खरेदीखत केलेले आहेत. तर अनेकांकडे नोंदणीकृत खरेदीखत नाहीत. त्यामुळे येथे भूसंपादन अधिनियम २०१३ चा वापर करून येथील मालमंत्ताधारकांना शासन आर्थिक मोबदला देणार नाही. त्यामुळे येथील मालमत्ता पाडताना रहिवाशांना मनपा प्रशासकांच्या खास बाब म्हणून अन्यत्र भूखंड देण्याचा विचार करावा लागेल. २०१२ मध्ये तत्कालीन मनपा आयुक्त डाॅ. पुरूषोत्तम भापकर यांनी टाउन हाॅल परिसरातील किलेअर्क ते मकई गेट आणि लक्ष्मणचावडी ते कैलासनगर येथील रस्त्याचे रूंदीकरण करताना येथील मालमत्ताधारकांना हर्सूल व पडेगावात भूखंड दिले होते. याच पध्दतीने येथील नागरिकांना विश्वासात घेऊन नवनियुक्त आयुक्तांनी गत ३१ वर्षांपासून कागदावर असलेल्या विकास आराखड्यातील या रस्त्यासाठी पुढाकार घेतला तर येथील नागरिक मालमत्ता पाडू देतील व रस्त्यासाठी सहकार्य करतील, असे जाणकारांचे मत आहे. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com