गंगापूर तालुक्याचे भाग्य उजळणार; 10 वर्षांपासून रखडलेला प्रकल्प...

Irrigation
IrrigationTendernama

औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील जुने लखमापूर गावठाणालगत गत दहा वर्षांपासून रखडलेली तब्बल साडेपाचशे कोटींची उपसा सिंचन योजना प्रत्यक्षात साकार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जायकवाडी प्रकल्प स्थळातील ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजनेतून थेट लखमापूर सिंचन योजनेत पाणी पोहोचवले जाणार असल्याने लखमापूरसह ४० गावांमधील दहा हजार हेक्टर शेतजमीन ओलिताखाली येणार असल्याने याभागातील शेतकऱ्यांचे भाग्य उजळणार आहे. या प्रकल्पाची डेंटर प्रक्रिया देखील अंतिम टप्प्यात असल्याचे कार्यकारी अभियंता धनंजय गोडसे यांनी 'टेंडरनामा'शी बोलताना सांगितले.

Irrigation
गडकरीजी, क्या हुआ तेरा वादा... पुणेकरांना तिसऱ्यांदा 'कात्रजचा...

या प्रकल्पासाठी ८ मार्च २०१९ रोजी ४ कोटी ७९ लाखाची मूळ प्रशासकीय वैधानिक मान्यता मिळाल्यानंतर त्याच दिवशी बांधकाम व व्यवस्थापणासाठी ४२१ कोटी ४७ लाखाची मूळ प्रशासकीय मान्यता देखील मिळाली आहे. या योजनेत एकूण दोन टप्पे आहेत. ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजना - ३ टप्पा क्रमांक - १ मध्ये ४५०० हेक्टर जमीन आहे. त्यानंतर याच योजनेतून टप्पा क्रमांक - २ मध्ये ५५०० हेक्टर जमीन अशी एकूण दहा हजार हेक्टर जमीन ठिबक सिंचनातून ओलिताखाली आणण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी बांधकामाच्या तपशिलासह विकास आराखडा देखील तयार करण्यात आला असून, सदर विकास आराखड्यासाठी सर्वक्षण अन्वेशन व इतर वैधानिक मान्यतेची कामे प्रगतीपथावर आहेत. या प्रकल्पासाठी कुठेही धरण बांधण्यात येणार नाही. कुठेही वृक्षतोड होणार नाही. कुणाच्याही शेतजमीनीचे अधिग्रहण अथवा भूसंपादन होणार नाही. या प्रकल्पासाठी केवळ पंपगृह, वितरण कूंड व पोहोच रस्त्यासाठी ४ हेक्टर व विद्युत पुरवठ्याची कामे व त्याची उभारणी करण्यासाठी २ हेक्टर खाजगी जमिनीची आवश्यकता आहे. तसेच भू भाडे तत्वावर पाईपलाईन टाकण्यासाठी पहिल्या टप्प्यात २३ व दुसऱ्या टप्प्यात १३ किलोमीटर अशी एकूण ३६ हेक्टर खाजगी जमिनीची आवश्यकता आहे. पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाल्यावर सदर जमिन संबंधित शेतकऱ्यांना वहिवाटीसाठी परत दिली जाणार आहे.

Irrigation
शिंदे सरकारने जलसंपदा विभागाच्या कामांवरील उठवली स्थगिती

गोदातीरी असणाऱ्या गंगापूर तालुक्यातून वाहनाऱ्या नदीवर पैठण येथे जायकवाडी हे मोठे धरण बांधण्यात आले आहे. या धरणाचे बॅकवाॅटर गंगापूर तालुक्यातील कायगाव टोकापर्यंत येते. मात्र धरण उशाला आणि कोरड घशाला अशी स्थिती गंगापूर तालुक्यातील अनेक गावांत पाहायला मिळत होती. येथील ग्रामस्थांना बाराही महिने पुरेल एवढे पाणी उपलब्ध होत नाही. परिणामी , हजारो शेतकऱ्यांना रब्बी अथवा उन्हाळी पिके घेता येत नाहीत. शेतीला बाराही महिने सिंचनाची व्यवस्था असणे गरजेचे आहे. गंगापूर तालुक्यात २०१२ ते २०१४ साली पडलेल्या भीषण दुष्काळात भूजल स्तर खूप खाली गेला आहे. शासनाने देखील हा भाग अवर्षण म्हणून घोषित केला आहे. जिथे माणसांना प्यायला पाणी नाही तिथे पशुपालन व्यवसाय देखील जिकिरीचा झाला आहे. चारापाण्याअभावी ग्रामस्थांनी चांगली जनावरे कसायाच्या हवाली केल्याने दुग्धव्यवसाय देखील अडचणीत आला आहे. ५०० फूट खोल खोदूनही पाणी लागत नव्हते. शिवाय अनेक गावांना पिण्याच्था पाण्यासाठी टॅकरवर विसंबून राहावे लागते.

गंगापूर तालुक्यातील दुष्काळी स्थिती आणि शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन याभागातील आमदार प्रशांत बंब यांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडे जायकवाडी जलाशयातून ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजना - ३ यातून गंगापूर तालुक्यातील जूने लखमापूर गावठाणालगत स्वतंत्र उपसा सिंचन योजना राबविण्याची मागणी लाऊन धरली होती. यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.

Irrigation
'ही' कंपनी २७ लाख वीज ग्राहकांना देणार स्मार्ट मीटर;2000 कोटी खर्च

प्रस्ताव अडकला लालफितीत

अखेर २०१० मध्ये गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत कार्यकारी अभियंता , लघु पाटबंधारे विभाग क्रमांक - १ औरंगाबाद यांच्यामार्फत प्रस्ताव देखील तयार करण्यात आला होता. मात्र तो गेली दहा वर्ष लालफितीत अडकला होता.

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग क्रमांक - १ औरंगाबाद या पदावर धनंजय गोडसे रूजु झाले. आणि खर्या अर्थाने गंगापूर तालुक्यातील अवर्षन भागाच्या विकासासाठी देव पावला. स्वतः शेतकरी कुटुंबातील असलेल्या गोडसे यांना शेतकर्यांच्या प्रश्नांची जाण आहे. पश्चिम महाराष्ट्रात कार्यरत असताना प्रकल्पातील अडथळे दुर कसे करावे याचा दिर्घ अनुभव पाठीशी असल्याने त्यांनी आमदार प्रशांत बंब यांच्या खांद्याला खांदा देत या दहा वर्षापासून रखडलेल्या प्रकल्पाचा प्रस्ताव लालफितशाहीतून बाहेर काढला.

जनसुनावनीत प्रकल्पाला हिरवा झेंडा

त्यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी तथा पर्यावरणविषयक समितीचे समन्वयक डाॅ. प्रविण जोशी, सदस्य तथा उप प्रादेशिक अधिकारी प्रदिप वानखेडे आणि समितीचे अध्यक्ष तथा अप्पर जिल्हाधिकारी डाॅ. अनंत गव्हाणे यांच्यासमक्ष १४ डिसेंबर २०१४ रोजी गंगापूर तालुक्यातील आरापूर या गावात जनसुनावणी घेण्यात आली होती. त्यात सर्व शेतकरी आणि राजकीय तथा सेवाभावी संस्थातील प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थांनी या प्रकल्पाला आडकाठी न आणता स्वागत केले व हिरवे झेंडे दाखवले. त्यामुळे प्रकल्पाचा मार्ग सुखकर झाला आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com