गडकरीजी, हाच का तुमच्या स्वप्नातील अमेरिकन दर्जाचा रस्ता?

512 कोटी रुपयांच्या नवीन बीड बायपासची पहिल्याच पावसात दाणादाण
New Beed Bypass
New Beed BypassTendernama

औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबादच्या दक्षिणेला आडगाव ते करोडी नवीन बीड बायपास एलएनटी कंपनीने तयार केलेला ५१२ कोटी किंमतीचा रस्ता अवघ्या सहा महिन्यांतच उखडला आहे. या रस्त्याचा दर्जा निकृष्ठ असल्याने ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी आडगाव, गांधेली, बाळापूर, देवळाई, सातारा, सिंदोन - भिंदोन, गोलवाडी, वाळुज आणि करोडी येथील शेकडो ग्रामस्थांनी केली आहे. तसेच, या प्रकरणी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) सर्व संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी, अशीही या ग्रामस्थांची मागणी आहे.

New Beed Bypass
शाहगंज घड्याळाची टिकटिक सुरु; हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत...

नव्याने बांधलेल्या आडगावलगत रस्त्याची झालेली चाळण, आरसीसी गटाराला पडलेले खिंडार आणि त्यात साचलेले खडी - माती अन् मुरुमाचे ढिगारे, भुयारी मार्गात भरलेली खड्ड्यांची जत्रा, गाजरगवतात गडप झालेले दुभाजकातील सुशोभिकरण, त्यात मार्गात पडलेले शेकडो खड्डे आणि तडे, निम्म्या रस्त्यावर पसरलेली माती आणि खडी, शोल्डर फिलिंग न करणे, ही या निकृष्ट कामाचे उत्कृष्ट उदाहरणे आहेत. या कामासाठी ५१२ कोटी रुपये किमतीचे कंत्राट बांधकाम क्षेत्रातील नामांकीत म्हणून गणल्या जाणाऱ्या एलएनटी (L&T) कंपनीला देण्यात आले होते. मात्र देखभाल - दुरुस्तीच्या मुदतीआधीच काही महिन्यांनी या नवीन रस्त्यासाठी वापरलेले डांबर खालच्या थरापासून निघून सर्व खडी बाहेर पडली असून, रस्त्यात मोठे खड्डे पडले आहेत.

New Beed Bypass
मुंबईत रस्त्यांसाठी 5800 कोटींचे टेंडर; पश्चिम उपनगरासाठी सर्वाधिक

पावसाळ्यापर्यंत खड्ड्यातून जा...
आडगाव येथील ग्रामस्थांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे वारंवार लेखी निवेदने दिली. मात्र त्यात तात्पुरते वेटमिक्स, खडी आणि मुरूम टाकले तर ते पावसाच्या पाण्यात वाहून जाते. त्यामुळे पावसाळ्यानंतर रस्त्याचा खराब झालेला सरफेस काढून त्याठिकाणी नव्याने काम केले जाणार असल्याचे सांगत प्रकल्प संचालक अरविंद काळे, सहाय्यक अभियंता राहुल पाटील हे ग्रामस्थांची बोळवन करत आहेत. दुसरीकडे या मार्गातील अनेक गावकरी देखील कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या नावाने बोटे मोडत आहेत. याच पानकळ्यात ५१२ कोटी खर्चून चकाचक दिसणारा हा उर्वरीत रस्ताही टक्केवारीच्या प्रवाहात वाहून जाणार की काय, असा प्रश्न येथील ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.

New Beed Bypass
Pune Ring road: 'या' शेतकऱ्यांना मिळणार तब्बल पाचपट मोबदला

पहिल्याच पावसात खाबुगिरी उघड

पहिल्याच पावसात आडगाव ते गांधेली दरम्यान पुलाखालील पाचशे मीटर रस्त्याची दाणादाण उडाली असून, त्यामुळे या कामातील एनएचएआयचे अधिकारी आणि एलएनटी कंपनीच्या अधिकाऱ्यांची खाबुगिरी उघड झाली आहे.

डिसेंबरमध्ये झाले होते काम...

डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत या महामार्गाचे काम पूर्ण करण्यात आले होते. शहरातील जुना बीड बायपास हा दोन पदरी धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ वर होता. मात्र जुना बीड बायपास हा जालना रस्त्याप्रमाणेच दाट वसाहतीतून जात असल्याने वाढत्या अपघाताचे आणि वाहतूक कोंडीचे प्रमाण रोखण्यासाठी एनएच-५२ हा नवा मार्ग शहराबाहेरून म्हणजे आडगाव ते करोडी असा ३० किलोमीटर लांबीचा नवा बीड बायपास तयार करण्यात आला. नोव्हेंबर- डिसेंबरच्या दरम्यान वाहतुकीसाठी तो खुला करण्यात आला होता. विशेष म्हणजे काम पूर्ण झाल्यावर वाहतूक सुरू झाल्यानंतर या महामार्गाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले होते.

New Beed Bypass
नितीन गडकरी म्हणतात, आता सॅटेलाईटद्वारे होणार टोलवसुली!

टेंडरनामा प्रतिनिधीची दोन्ही बाजुने ६० किलोमीटर पाहणी

नवा बीड बायपास रोड हा आडगाव ते करोडी असा ३० किमी लांबीचा आहे. शहराबाहेरून गेलेल्या या महामार्गाच्या दोन्ही बाजूने टेंडरनामा प्रतिनिधीने आडगाव, गांधेली, देवळाई, सातारा, कांचनवाडी, वळदगाव, करोडी, माळीवाडापर्यंत दोन्ही बाजुने ६० किलोमीटर पर्यंत पाहणी केली. २०१८ मध्ये बांधकाम सुरू झालेल्या या नवीन बायपासची मुदत ऑगस्ट २०२१ पर्यंत कंत्राटदाराला दिलेली होती. मात्र, कोरोनामध्ये मजूर, अभियंते आपापल्या गावी गेल्याने हे काम रखडले. त्यामुळे एनएचएआयने त्याला तीन महिन्यांची मुदतवाढ दिली होती. डिसेंबर अखेरपर्यंत या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले होते. ३० किलोमीटर लांबीच्या या रस्त्यावर लहान-मोठे एकूण ११२ पूल आहेत. या रस्त्याच्या बांधकामासाठी एकूण ५१२ कोटी रुपये खर्च आला आहे.

New Beed Bypass
मर्जीतील संस्थांनाच पोषण आहाराचे टेंडर; अपात्र संस्थांचे...

काय आहेत समस्या?

● या राष्ट्रीय महामार्गावर कांचनवाडी ते करोडीपर्यंत सर्व्हिस रोडवर रस्त्याच्यामधोमध २५ ठिकाणी जीवघेणे खड्डे आहेत.

● आडगाव, गांधेली, बाळापूर, देवळाई, सातारा, एसआरपीएफ कँप, कांचनवाडी, गोलवाडी, वाळूज लिंक रोड, तिसगाव चौफुली, करोडी येथील भुयारी मार्गात खड्ड्यांची जत्रा भरली असून, त्यात पाणी साचल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. भुयारी मार्गात मर्क्युरी दिवे न लावता ट्युबलाईट लावले आहेत. रात्री दिवे देखील बंद असल्याने अंधार पडतो.

● भुयारी मार्गावरील स्लॅबच्या बाॅक्स कन्व्हर्टमध्ये स्लॅब न टाकता अर्धवट लोखंडी पत्रे बांधल्यामुळे आत पावसाचे पाणी शिरून भुयारी मार्गासह जोड रस्त्यांना हानी पोहोचून खड्डे पडत असल्याचे 'टेंडरनामा'च्या पाहणीत उघड झाले.

● आडगाव ते बागतलाव दरम्यान पुलाखालील जोडरस्ताच खड्ड्यात गेल्यामुळे भर पावसाळ्यात वाहनकांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे. चिखल आणि खड्ड्यात पाणी भरल्याने ये-जा करणाऱ्या ग्रामस्थांसह अवजड वाहतुकीला कोंडीचा सामना करावा लागत आहे. यामुळे अपघात देखील घडत आहेत.

● अनेक ठिकाणी आरसीसी गटारीचे काम अर्धवट करण्यात आले आहे. पहिल्याच पावसात रस्त्याची वाताहत सुरू झाल्याने अधिकाऱ्यांनी काही ठिकाणी भर पावसाळ्यात गटारीचे काम काढल्याचे दिसले.

● आडगाव ते माळीवाडा दरम्यान ३० ते ४० ठिकाणी रस्त्यावर माती आणि मुरुमाचे ढिगार अपघाताला आमंत्रण देत आहेत.

● रस्त्याच्या काही अंतरावर ढाबे, हाॅटेल आणि डोंगराकडे खडी क्रेशर केंद्रांकडे पक्के रस्ते नसल्याने चिखलातून येणारे ट्रक महामार्गावर येताच रस्त्यावर चिखलाचे प्रमाण वाढले आहे.

New Beed Bypass
इलेक्ट्रिक वाहनांच्या किमतींबाबत गडकरींची मोठी घोषणा; 2023मध्ये...

अमेरिकन दर्जाचा रस्ता?

औरंगाबादेत २४ एप्रिल रोजी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने ३,३३१ कोटी रुपयांच्या महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन आणि २ हजार २५३ कोटी रुपयांच्या ४ महामार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पन प्रसंगी नितीन गडकरी यांनी २०२४ पर्यंत मराठवाड्यातील रस्ते (Marathwada Roads) अमेरिकन दर्जाचे (American Standard) होतील, अशी ग्वाही दिली होती. मात्र या रस्त्याची अवस्था पाहता हाच का गडकरींच्या स्वप्नातला अमेरिकन दर्जाचा रस्ता, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. या रस्त्याच्या निकृष्ट कामावरून मराठवाड्यात राष्ट्रीय महामार्ग विभागांतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या ७ वर्षांत सुमारे ४५० किलोमीटर बांधण्यात आलेल्या रस्त्यांच्या दर्जासंदर्भात प्रश्रचिन्ह उभे राहते आहे. त्यामुळे गडकरींनी मंजुरी दिलेल्या ४,४२२ कोटी रुपयांच्या १३ कामांमध्ये दर्जात सुधारणा व्हवी अशी स्थानिक नागरिकांची अपेक्षा.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com