यवतमाळ (Yavatmal) : आर्णी पोलिस स्टेशनसाठी (Police Station) शहराच्या मुख्य रस्त्याला लागून असलेली 43 आर जागा मंजूर करण्यात आली आहे. त्या जागेचा सातबारासुद्धा पोलिस स्टेशनच्या नावावर झाला आहे. मात्र, अद्याप पोलिस ठाणे आणि कर्मचारी निवासस्थानांच्या बांधकामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे पोलिस अधिकारी, कर्मचारी किरायाच्या घरातच राहत असून, त्यांना नविन पोलिस ठाणे, वसाहतीची प्रतिक्षा आहे.
शहरातील मुख्य रस्त्याजवळ असलेल्या शासकीय जागेवर अतिक्रमण करण्यात आले होते. तत्कालीन ठाणेदार पितांबर जाधव यांनी अतिक्रमण हटवून ती जागा मोकळी करून घेतली होती. ती जागा पोलिस ठाणे आणि पोलिस वसाहतीसाठी मिळावी म्हणून पाठपुरावा केला होता. संबंधित यंत्रणा व वरिष्ठांकडे पाठपुरावा करून त्यांनी शेवटी ती जागा मंजूर करवून घेतली. आता ती जागा अधिकृतपणे पोलिस स्टेशनच्या नावाने झाली आहे.
आता त्या जागेवर उमरखेडच्या धर्तीवर नवीन पोलिस स्टेशनची इमारत आणि वसाहत व्हावी, यासाठी नवीन ठाणेदार केशव ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. या जागेवर उमरखेडच्या धर्तीवर बांधकाम काम व्हावे, अशी अपेक्षा आहे. तेथे खाली पार्किंग आणि वर पोलिस स्टेशनची वास्तू बांधली जाऊ शकते.
नवीन इमारतीत पोलिस स्टेशन डायरी कक्षासमोर व महिला व पुरुष आरोपी लॉकअप ठेवता येऊ शकते. येथे महिला व पुरुष आरोपी लॉकअप उमरखेडपेक्षा मोठे ठेवण्याची मागणी आहे. त्यामध्ये किमान 20 आरोपी ठेवण्याची व्यवस्था असावी, मुद्देमाल कक्ष हा कमीत कमी 40 बाय 25 चौरस फुटाचा असावा. त्यात मुद्देमाल ठेवण्यासाठी कप्पे बनविण्यात यावेत.
क्राईम कक्ष 20 बाय 20 चौरस फुटाचा असावा. विविध सुविधा वाढविण्याचीही गरज आहे. याबाबत ठाणेदार केशव ठाकरे यांनी संभाव्य आराखडाच पत्रातून मांडला आहे. पोलिस स्टेशनची वास्तू आणि वसाहतीचे बांधकाम त्वरित व्हावे, यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी ठाकरे यांनी पत्रातून पोलिस अधीक्षकांकडे केली.
दोन सर्व्हे नंबरमधील जागा उपलब्ध
जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिस स्टेशन आर्णीकरिता शेत सर्व्हे नं. 4/2 मधील 0.35 आर. जमीन, शेत सर्व्हे नं. 5/3 मधील 0.08 आर. जमीन, अशी एकूण 0.43 आर. जमीन उपलब्ध करून दिली आहे. पोलिस स्टेशनकरिता ही जागा मंजूर झाली. नुकतीच 10 ऑगस्ट २०२३ रोजी ही जागा पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आली आहे. त्यामुळे आता बांधकाम त्वरित व्हावे, यासाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला जात असल्याचे ठाणेदार केशव ठाकरे यांनी सांगितले.
पोलिस, नागरिकांना होणार सोयीचे
नवीन ठिकाणी पोलिस ठाणे झाल्यास नागरिकांच्याही सोयीचे ठरणार आहे. निवासस्थाने झाल्यास पोलिस कर्मचाऱ्यांना डोक्यावर हक्काचे छप्पर मिळणार आहे. सध्याची पोलिस स्टेशनची इमारत 1937 पूर्वीची असल्याने ती जीर्ण झाली आहे. आता शहराचा विस्तार झाल्याने तथा रस्ता अरुंद असल्याने अनेकदा महत्त्वाच्या वेळी पोलिसांचे वाहनही या रस्त्यावर अडकून पडल्याचे चित्र पाहायला मिळते. नवीन वास्तू झाल्यास यापासून सुटका मिळणार आहे.