
पुणे (Pune) : समृद्धी महामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी परिवहन विभागाने चतुःसूत्री राबवली आहे. यात चांगले यश देखील मिळाले आहे. चालकांचे ब्रेथ अनलायझरने टेस्ट करणे, वेगाने धावणाऱ्या वाहनांवर कारवाई, टायरची तपासणी व लेन कटिंग करणाऱ्यावर कारवाई यामुळे अपघाताचे प्रमाण २० टक्क्यांनी तर मृत्यूचे प्रमाण ३३ टक्क्यांनी घटले आहे.
राज्याच्या परिवहन विभागाने गेल्या दीड ते दोन वर्षांत अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी समृद्धी महामार्गावर आठ ठिकाणी २४ तास कारवाई सुरू ठेवली. सुमारे दोन लाख वाहनांची तपासणी करण्यात आली. यात सुमारे १५ हजारांपेक्षा जास्त वाहनांवर वेगवेगळ्या कारणांसाठी कारवाई करण्यात आली. महामार्गाच्या प्रवेश व बाहर पडण्याच्या ठिकाणी सर्वांत जास्त कारवाई करण्यात आली. परिणामी अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली.
पथके २४ तास कार्यरत
समृद्धी महामार्गावर आरटीओच्या आठ कार्यालयांचे वायू वेग पथक २४ तास कार्यरत होते. यात नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलडाणा, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर आदी कार्यालयांच्या पथकाचा समावेश आहे.
एकूण अपघात ----प्राणांतिक अपघात------गंभीर अपघात------- किरकोळ अपघात----मृत्यू
जानेवारी ते ऑगस्ट २३ : १०३ ------६३----१२--------२०-------१२०
जानेवारी ते ऑगस्ट २४ : ८३-------५७-----१५------८---------८०
टक्केवारी (घट) : २०% -- १०%----२५%----६०%-----३३%
ही आहेत कारणे
१. निर्धारित वेगाइतके वाहन चालविणे
२. लेन कटिंग न करणे
३. वाहन चालविताना सीट बेल्ट वापरणे
४. वेगाबद्दल चालकांचे होणारे समुपदेशन
यामुळे झाली कारवाई
मद्य पिऊन वाहन चालविणे, टायर खराब स्थितीत असताना देखील वाहन चालविणे, अतिवेगाने वाहने चालविणे, लेन कटिंग, सीटबेल्ट न वापरणे, अवैध पार्किंग, वाहन चालविताना मोबाईलचा वापर, वाहन परवाना नाही, विमा नसलेली वाहने, परमीट नसलेले वाहने, प्रवासी वाहतुकीतून मालाची वाहतूक आदी कारणांमुळे परिवहन विभागाने कारवाई केली.
समृद्धी महामार्गावर अपघाताचे प्रमाण कमी व्हावे यासाठी परिवहन विभागाने चार प्रमुख गोष्टींवर भर दिला. तसेच मार्गावर येणाऱ्या प्रत्येक चालकाने मद्यप्राशन केले आहे की नाही या बाबतची चाचणी होते. टायर, लेन कटिंगवरदेखील मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. परिणामी अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली.
- भारत कळसकर, परिवहन उपायुक्त, मुंबई