
नागपूर (Nagpur) : नागपूर महानगर पालिकेचे (NMC) प्रभाग क्रमांक 23 चे भाजपचे माजी नगरसेवक व परिवहन समितीचे माजी सभापती, तसेच एनआयटीचे माजी विश्वस्त नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी स्वतः नागपूर महानगरपालिका व एनआयटीच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एनआयटीला 14 कोटींचे विकासकार्य करण्याचे निर्देश दिले होते. फाइल सुद्धा तयार करण्यात आल्या होत्या. परंतु या कामांना कुठे अडथळा आला, फाइल का बर अडवून ठेवण्यात आल्या, अधिकाऱ्यांनी कुणाच्या तरी दबावाखाली फाइल अडवून ठेवल्या आहेत, असे आरोप लावण्यात आले.
मागील दीड वर्षांपासून नागपूर महानगरपालिका बरखास्त झालेली असून सध्या मनपामध्ये प्रशासकांची मनमानी सुरू आहे. तिथे सर्वसामान्य जनतेच्या कामांची पूर्तता होत नसल्याचे चित्र स्पष्ट आहे. प्रभाग 23 मधिल सिव्हर लाईन नविन टाकणे व दुरूस्ती करणे, अतिशय खस्ताहाल व खराब झालेले रस्त्यांचे बांधकाम करणे, तसेच नागपूर सुधार प्रन्यास अंतर्गत येणारे मैदान व उद्यानांमध्ये नागरिकांच्या सोईच्या दृष्टीने विकास कामे करणे, आदी महत्वाच्या विकास कामांची यादी नरेंद्र बोरकर यांनी दोन्ही विभागाच्या प्रशासकांना दिलेली आहे. परंतु आजपर्यंत त्यांच्या निवेदनावर कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली दिसत नाही.
55 ते 60 वर्षे जुन्या गडर लाईन चोक झाल्या असून प्रभागातील नागरीकांच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहे. या संदर्भात तत्कालीन आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी गडर लाईन करीता 5 कोटी रुपयांचा DPR तयार करण्यास सुचविले. फाईल तयार केल्या नंतर झोन क्र. 08 चे आरोग्य अधिकारी, कनिष्ठ अभियंता, उप अभियंता व कार्यकारी अभियंता यांनी सदर यादीतील सर्व गडर लाईन्सची मोका तपासणी व खोलवर अभ्यास करून संबंधित नकाशे, लांबी, रुंदी, खोलीचा (डेप्थ) अहवाल फाईलला जोडून अधिक्षक अभियंता तालेवार यांना सादर केला. मात्र सर्व कागदपत्रे जोडल्यानंतरही पीएचईच्या अधिकारी बॅनर्जी यांनी नोटशिट वर या कामाचा खर्च कोणत्या हेड मधून होणार आहे, गडर लाईन किती वर्षे जुनी आहे, लांबी, रुंदी, खोली (डेप्थ) किती अशा प्रकारच्या नाहक त्रुटी काढून ती फाईल अधि. अभियंता यांचे सहाय्यक मांगे यांच्या मार्फत झोन क्र. 08 ला परत पाठवून फाईल थांबविण्याचे काम अधिकाऱ्यांनी केले.
प्रशासकीय प्रणालीवर रोष...
प्रभाग क्र. 23 अंतर्गत बहुतांश रस्त्यांची स्थिती अत्यंत दयनीय आहे. रस्ते उखडले आहे. त्यावर जागोजागी खड्डे पडलेले असल्यामुळे पावसाळ्यात पाणी साचून तिथे नेहमी छोटे मोठे अपघात होत असतात. त्यामुळे नागरिकांना वाहतुकीला त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात तत्कालीन आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी निवेदनाच्या आधारावर त्यांनी सर्व रस्त्यांची पाहणी केली व सदर सर्व रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रिट बांधकामाचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. परंतु ही सर्व कामे विद्यमान आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी नाहक कारणांमुळे थांबवून घेतली, त्यामुळे नागरिकांमध्ये मनपा प्रशासन कार्यप्रणालीवर अत्यंत रोष निर्माण झालेला आहे. संबंधित कामे वेळेत पूर्ण केली गेली नाही तर मनपा आयुक्त व एनआयटी चेयरमेनच्या चेंबरमध्ये घाण कचरा फेकून आंदोलन करण्याचा इशारा बोरकर यांनी दिला आहे.