
नागपूर (Nagpur) : मानकापूर परिसरात जिल्हा रुग्णालय उभारण्याची घोषणा काँग्रेस (Congress) सरकारने 2013 मध्ये केली होती. सत्ता बदलानंतर भाजप-सेनेच्या (BJP - Shivsena) सरकारने जिल्हा रुग्णालयासाठी 28 कोटीचा निधी मंजूर केला. 2018 मध्ये प्रत्यक्ष बांधकामास सुरवात झाली. या सात वर्षांत 28 कोटींच्या जिल्हा रुग्णालयाच्या बांधकामाचा खर्च 59 कोटींवर पोचला. पण अद्यापही बांधकाम अपूर्णच असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
कोराडी मार्गावर 2016 मध्ये प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या आठ एकर जागेवर 100 खाटांच्या जिल्हा रुग्णालयाच्या बांधकामाचे भूमिपूजन झाले. चार एप्रिल 2016 रोजी बांधकामासाठी आवश्यक निधी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तिजोरीत वळता झाला होता. यानंतर सात वर्षे लोटली आहेत. या सात वर्षांत 90 टक्के काम पूर्ण झाले. अद्यापही 10 टक्के काम शिल्लक असल्याची माहिती पुढे आली आहे.
वर्षानूवर्षे लोटल्यामुळे बांधकामाचा खर्च दुपटीपेक्षा जास्त वाढला. 28 कोटीच्या बांधकामात नव्याने शवागारासह इतर बांधकामाचा 14 कोटीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. रुग्णालय उभारताना वॉर्ड, ऑपरेशन थिएटर तसेच शवागार (शवविच्छेदन कक्ष) उभारणे ही अत्यावश्यक बाब आहे. शवागाराशिवाय जिल्हा रुग्णालय असूच शकत नाही. ही बाब माहीत असताना बांधकामाचा नकाशा मंजूर करताना शवागार नकाशात का दाखवले नाही? असा सवाल पुढे येतो.
नव्याने शवागारसह इतर कामांसाठी 14 कोटीचा प्रस्ताव आरोग्य विभागाने शासनाकडे सादर केला होता. आतापर्यंत शासनाने 44 कोटींचा निधी जिल्हा रुग्णालयाच्या उभारणीवर खर्च केला.
15 कोटींचा प्रस्ताव इपीसी समोर
नव्याने धर्मशाळा, मॉड्युलर ओटी, कॅन्टीन व इतर फिनिशिंगसाठी नव्याने 15 कोटीचा प्रस्ताव सादर करण्यात आला. हायपावर कमेटीकडून प्रस्ताव मंजूर झाला. सध्या इकॉनॉमिक पावर कमेटीकडे प्रस्ताव आहे. या कमेटीकडून हिरवी झेंडी येताच कामाला सुरवात होईल. मात्र, बांधकाम का पूर्ण होत नाही, ही खेळी कुणाची, अशी जोरदार चर्चा आरोग्य विभागात रंगली आहे.
शंभर खाटांच्या जिल्हा रुग्णालयाचे काम सुरू आहे. कोरोनाच्या उद्रेकजन्य स्थितीत जिल्हा रुग्णालयाचे बांधकाम थांबले होते. जीएसटीमुळे काही प्रमाणात बांधकामाचा खर्च वाढला. सध्या 15 कोटींच्या फिनिशिंगचा प्रस्ताव इपीसीकडे आहे. प्रस्ताव मंजूर होताच कामाला सुरवात होईल. लवकरच बांधकाम पूर्ण होईल, अशी माहिती नागपूरचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी दिली.