
नागपूर (Nagpur) : जलयुक्त शिवार योजनेंतर्गत नागपूर जिल्ह्यातील अतिरिक्त 10 हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे. जिल्ह्यातील 243 गावांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली.
वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार, व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनमती) येथे आयोजित नागपूर जिल्ह्याच्या खरीपपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. खतांचे लिंकिंग करणाऱ्या दुकानदारांचे परवाने कायम स्वरुपी रद्द करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिले.
ते म्हणाले की, हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदाच्या हंगामात पाऊस कमी झाल्यास पीक पद्धतीत बदल आणि इतर उपाययोजनांसाठी प्रशासनाने सज्ज राहावे.
यावर्षी बियाण्याची उपलब्धता
फडणवीस म्हणाले की, यंदा बियाणांची उपलब्धता आहे. याशिवाय उच्च दर्जाचे देशी बियाणे तयार करण्याची तयारी सुरू आहे. खतांची उपलब्धता पुरेशी आहे. गेल्या वर्षीचा 80 टक्के स्टॉक उपलब्ध आहे. त्यामुळे खताची अडचण नाही. मात्र, बियाणे, खते, कीटकनाशके यांचा तुटवडा भासणार नाही याची काळजी घ्या. पाऊस लांबल्यास कपाशीची पेरणी कमी होऊ शकते. त्यामुळे आकस्मिक योजना तयार ठेवा. यंदा एक अभिनव प्रयोग म्हणून ड्रोनद्वारे फवारणीला प्राधान्य दिले जाणार आहे. यामध्ये बचत गटांना सहभागी करून घेण्याचे आवाहन केले.
बैठकीत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मुक्ता कोकर्डे, खासदार कृपाल तुमाने, आमदार सुनील केदार, राजू पारवे, विकास कुंभारे, समीर मेघे, आशिष जैस्वाल, अभिजीत वंजारी, टेकचंद सावरकर, प्रवीण दटके, मोहन मते, उपाध्यक्ष कुंदा राऊत, कृषी सभापती प्रवीण जोध, जिल्हा दंडाधिकारी डॉ. विपिन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शर्मा आदी उपस्थित होते.
विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कृषी विभागाच्या यावर्षीच्या योजनांचे सादरीकरण केले.