Gondia News : गोंदिया - मुंबई समृद्धी महामार्ग शेतकऱ्यांना समृद्ध करणार का?
Gondia News गोंदिया : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा विस्तार आता गोंदियापर्यंत करण्यात येणार आहे. या महामार्गाचे काम सुरू झाले असून जिल्ह्यातील तिरोडा व गोंदिया तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या महामार्गाच्या विस्तारीकरणामुळे गोंदिया ते मुंबई हे अंतर 8 ते 10 तासांत शक्य होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कृषी क्षेत्राला चालना मिळणार आहे.
या समृद्धी महामार्गामुळे जिल्ह्यात समृद्धी येईल. भूसंपादन सुरू असून महामार्गालगतच्या जमिनी सोन्याच्या भावाने विकल्या जात आहेत. गोंदिया जिल्ह्याची अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीवर आधारित आहे. जिल्ह्यात 2 लाख 10 हजार हेक्टर लागवडीचे क्षेत्र आहे. यापैकी 1 लाख 80 हजार हेक्टरवर भातशेती तर 12 हजार हेक्टरवर भाजीपाल्याची लागवड होते. येथे भात प्रक्रिया उद्योग नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती झाली नाही. सुमारे तीन-चार वर्षांपासून जिल्ह्यातील काही शेतकरी ऊस, भाजीपाला तसेच फळे लागवडीकडे वळत आहेत.
शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल मोठ्या बाजारपेठेत पोहोचत नाही. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत त्यांचा माल विकून ते समाधानी राहतात. यातून त्यांना फारसे उत्पन्न मिळत नाही, मात्र आता सरकारने समृद्धी महामार्ग गोंदियापर्यंत विस्तारित करण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आशेची किरण जागृत झाली आहे.
या संदर्भात कामही सुरू झाले आहे. या समृद्धी महामार्गावरून शेतकऱ्यांना वाहतुकीची सुविधा मिळणार आहे. भाजीपाला, दूध, फळे या नाशवंत वस्तू आहेत. त्यामुळे त्यांची वाहतूक जितकी जलद तितकी सोयीस्कर होईल. समृद्धी महामार्गामुळे जिल्ह्यातील शेतकरी आपला शेतमाल नागपूर, मुंबई, नाशिक व इतर मोठ्या बाजारपेठेत नेऊन चार पैसे अधिक मिळवू शकणार आहेत. त्यामुळे हा महामार्ग शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणण्याचे माध्यम ठरणार आहे.
सध्या या महामार्गासाठी तिरोडा आणि गोंदिया तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांची यादी ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध करण्यात येत आहे.
जमीन खरेदी करण्याची शर्यत :
समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादन केले जात आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. मात्र प्रकल्पग्रस्त शेतकरी इतरत्र जमिनी खरेदी करत आहेत. या महामार्गामुळे जिल्ह्यात उद्योग उभारण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे हा महामार्ग ज्या परिसरातून जातो त्या परिसरात जागा खरेदी करण्याची शर्यत आतापासूनच सुरू झाली आहे. त्यामुळे जमिनीला सोन्यासारखा भाव आला आहे.