Gadchiroli News : सती नदीवरील पुलाच्या बांधकामाला अखेर मुहूर्त
गडचिरोली (Gadchiroli) : कुरखेडा शहरालगत असलेल्या सती नदीवरील मोठ्या पुलाचे बांधकाम तांत्रिक अडचणीमुळे मागील दोन महिन्यांपासून बंद होते. पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक बंद झाल्यास मोठी समस्या निर्माण होणार होती. स्थानिक आमदारांनी वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता यांची संयुक्तपणे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संयुक्त बैठक घेत चर्चा केली व निर्माण झालेली तांत्रिक अडचण मार्गी लावली. दोन महिन्यांपासून बंद असलेल्या पुलाचे बांधकाम पुन्हा सुरू झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नागपूर ते रायपूर मंजूर नवीन राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत सध्या ब्रह्मपुरी ते वडसा, कुरखेडा, कोरची या मार्गाचे रुंदीकरण मजबूतीकरण तसेच या मार्गातील पुलांचे बांधकाम करण्यात येत आहे. या अंतर्गत कुरखेडा सती नदीवरील जुना पूल तोडत याच ठिकाणी उंच व मजबूत नवीन पुलाचे बांधकामाला सुरुवात करण्यात आली होती. मात्र, सदर बांधकाम वनविभागाच्या जमिनीवर असल्याने 4.98 हेक्टर आर. जागा वनविभागाकडून वळती करून घेण्याकरिता प्रस्ताव सादर केला होता.
पर्यायी वनीकरणाकरिता 31 मार्च 2024 रोजी 27 लक्ष 99 हजार 27 रुपये राष्ट्रीय महामार्ग यांच्या वतीने वडसा वनविभागाकडे वळते केले. मात्र, या खात्यात काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे रक्कम जमा करता आली नाही. या तांत्रिक अडचणीमुळे सदर बांधकाम बंद होते.
सती नदीवरील हा पूल अत्यंत महत्त्वाचा आहे. कुरखेडा ते कोरची, मालेवाडा, वैरागड यांना जोडणारा आहे. तसेच नदीपलीकडील अनेक लहान मोठी गावे या पुलाने तालुका मुख्यालयाशी जोडलेली आहेत. सध्या रपटा तयार करीत येथून वाहतूक सुरू आहे. मात्र, हा कच्चा रपटा पावसाळ्यात वाहून जाणार आहे. नवीन पुलाचे बांधकाम पूर्ण न झाल्यास हा मार्ग बंद होत नागरिकांची मोठी अडचण होणार आहे.
या मार्गाला पर्यायी असलेले मार्ग फेऱ्यांचे आहेत. तसेच लहान पूल, गाव खेड्यातून गेलेले अरुंद व नागमोडी रस्ते यामुळे हे मार्ग धोक्याचे व जडवाहतुकीसाठी अडचणीचे आहे. त्यामुळे या नवीन पुलाचे बांधकाम युद्धपातळीवर करीत पावसाळ्यापूर्वी या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याकरिता स्थानिक आमदारांनी पुढाकार घेत मुख्य वनसंरक्षक गडचिरोली, उपवनसंरक्षक वडसा तसेच राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंता गडचिरोली यांच्याशी संयुक्त व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करीत हा प्रश्न मार्गी लावला.
तर तालुक्याशी तुटणार संपर्क :
त्या ठिकाणी जुने पूल होते. ते पूल तोडून त्याच जागेवर नवीन पुलाचे बांधकाम केले जात आहे. सध्या नदीपात्रातून रपटा बनवण्यात आला आहे. या रपट्यावरून वाहतूक सुरू आहे. मात्र, सदर रपटा पावसाळ्यात वाहून जाणार आहे. त्यामुळे या मार्गाने वाहतूक बंद होणार आहे. या मार्गाला पर्यायी असलेले मार्ग फेऱ्यांचे आहेत.