.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Buldhana News बुलडाणा : राज्यातील नवीन वैद्यकीय महाविद्यालयांनी नॅशनल मेडिकल कमिशनकडे (एनएमसी) मान्यतेकरिता प्रस्ताव पाठवले होते. देशातील 112 व राज्यातील 14 वैद्यकीय महाविद्यालयांना 6 जुलै रोजी अंतिम मान्यता मिळाली आहे. यामुळे राज्यातील एमबीबीएसच्या जागांमध्ये एक ते दीड हजारांची भर पडणार आहे.
एनएमसीकडे देशभरातून 112 नवीन वैद्यकीय महाविद्यालयांचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. ऑनलाइनच्या माध्यमातून आलेले सर्वाधिक अर्ज उत्तर प्रदेशमधून तर त्यानंतर महाराष्ट्रातून अर्ज दाखल झाले होते. प्रत्येक जिल्ह्यात सरकारी रुग्णालय असावे आणि त्याला संलग्नित वैद्यकीय महाविद्यालय हे सरकारचे धोरण प्रत्यक्षात उतरविन्यासाठी जास्तीत जास्त महाविद्यालयांना परवानगी देण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे.
6 जुलै रोजी एनएमसीने देशातील 112 व राज्यातील 14 वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी दिली. अंबरनाथ, पालघर, हिंगोली, गडचिरोली, भंडारा, बुलडाणा, मूर्तिजापूर (अकोला), मुंबई, जालना, वाशिम, नाशिक, औरंगाबाद, नवी मुंबई आणि अमरावती येथे प्रत्येकी 100 जागांची क्षमता असलेली महाविद्यालये स्थापन करण्याच्या दृष्टिने ऑनलाईन प्रस्ताव सादर झाले होते.
यातील दहा शासकीय तर चार खाजगी महाविद्यालयांचा समावेश होता. या महाविद्यालयांना 6 जुलै रोजी अंतिम मान्यता देण्यात आली आहे. या प्रस्तावित महाविद्यालयांमधील पदे भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे समजते. एमपीएससीमार्फत ही पदे भरण्यात येणार आहेत. वैद्यकिय महाविद्यालयांचे प्रस्ताव तपासणीची पहिली फेरी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये पार पडली. जून-जुलैमध्ये नव्या महाविद्यालयांची मंजुरीची प्रक्रिया संपेल अशी आशा व्यक्त केल्या जात होती.
या महाविद्यालयांना अंतिम परवानगी मिळाल्याने एकूण जागांमध्ये एक ते दीड हजारांची भर पडणार आहे. खासगी महाविद्यालयांचे शुल्क न परवडणाऱ्या विद्यार्थ्यांना यामुळे निश्चितपणे दिलासा मिळेल.
खुल्या प्रवर्गाला दिलासा :
मराठा आरक्षणामुळे (एसईबीसी) खुल्या वर्गातील 10 टक्के जागा कमी झाल्या होत्या. आता राज्यातील 14 व देशातील 112 वैद्यकिय महाविद्यालयांना मान्यता मिळाल्याने खुल्या गटातील विद्यार्थ्यांना या वाढीव जागांमुळे काहीसा दिलासा मिळू शकतो.
राज्यातील दहा शासकीय वैद्यकिय महाविद्यालयांना अंतिम मंजुरी मिळाल्याने खाजगी महाविद्यालयांचे शुल्क न परवनाऱ्या विद्यार्थ्यांंना यामुळे निश्चित दिलासा मिळेल. यामुळे एमबीबीएसच्या जागांमधेही वाढ होणार असल्याने ही अधिक चांगली बाब आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. माधवी जवरे यांनी दिली.