भंडारा (Bhandara) : भंडारा विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या पवनी तालुक्याला ऐतिहासिक स्थळांचे वरदान आहे. विदर्भाची काशी अशी ओळख असलेल्या पवनी शहराचे ऐतिहासिक महात्म्य मोठे आहे. तालुक्याला वैनगंगेचे विस्तीर्ण पात्र लाभले आहे. गोसे खुर्द प्रकल्पही येथे आहे. विकासाला बराच वाव आहे, तरीही तालुक्याचा विकास मात्र शून्य आहे.
विकासाचे आश्वासन देत लोकप्रतिनिधी प्रचार जोरात करीत असले तरी एवढ्या वर्षात विकासाचे घोडे कुठे अडले, हे सांगण्यासाठी कुणीही पुढारी पुढे मात्र येत नाही. तालुक्यात एकही उद्योगधंदा सुरू न झाल्याने बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे.
इंदिरा सागर राष्ट्रीय प्रकल्प 40 वर्षांतही पूर्ण होऊ शकला नाही. प्रकल्पाचा डावा कालवा तालुक्याच्या मधोमध असलेल्या कोंढा, आसगाव (चौरास) भागातून जातो; पण या कालव्याचे काम पूर्ण झाले नाही.
हे आहेत तालुक्याचे प्रश्न
चाळीस वर्षांपासून गोसे प्रकल्पाचे काम रखडले असून, डाव्या कालव्याचे काम अपूर्ण, बारमाही सिंचनाच्या सुविधेची तालुक्याला गरज, रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रुंदीकरण काम त्वरित होणे आवश्यक, तालुक्यात एमआयडीसी नावापुरतीच, बेरोजगारांचे कामासाठी स्थलांतरण, पर्यटन स्थळाच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्नांची गरज, ग्रामीण भागात वारंवार वीज जाते. फिडरची मागणी कायम आहे.
उद्योगांची वानवा :
तालुक्यात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात असले तरी धानावर प्रक्रिया करणारे उद्योग नाहीत. तालुक्यात वाही वसाहत येथे एमआयडीसी मंजूर आहे; पण एकही उद्योग आलेला नाही. तालुक्यात तरुणांच्या हाताला काम नाही, शेती बिन भरवशाची आहे. सिंचनाच्या सुविधा आहेत; पण अनेक सिंचन योजना अपुऱ्या आहेत.