
भंडारा (Bhandara) : भंडारा (Bhandara) तालुक्यात राज्य शासनाच्या योजनेतून पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 2023 - 24 मध्ये ओबीसींना 1,454 घरकुल मिळणार आहेत. रमाई आवास योजनेअंतर्गत 2021-22 आर्थिक वर्षामध्ये 300 घरकुलाच्या उद्दिष्टांपैकी 188 घरकुलासाठी मंजुरी मिळाली आहे. 2022-23 साठी शबरी योजनेसाठी 53 घरकुल उद्दिष्टांपैकी 25 घरकुलाला मंजुरी मिळाली असल्याने बोटावर मोजक्या लाभार्थीचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
लाखनी तालुक्यातील सर्व गरीब ढिवर बांधवांना घरे मिळावी, यासाठी यशवंतराव मुक्त वसाहत योजना प्रस्तावित करून आर्थिक वर्ष 2021-22 वर्षासाठी 388 घरकुल मंजूर झाली असली तरीही आजपर्यंत निधीचे वाटप झाले नाही. त्यामुळे उद्देशपूर्ती पूर्ण होण्याची प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारच्या हालचाली दिसत नाहीत. तसेच पंतप्रधानांनी 2024 पर्यंत व सर्वांना पक्के घर देण्याची घोषणा केली असली तरी 2022-23 व 2023-24 ची पंतप्रधान आवास प्लस निधी वितरित न केल्याने गरिबांचे 2024 मध्ये पक्क्या घराचे स्वप्न भंगणार आहे. याकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची अपेक्षा आहे.
यशवंतराव मुक्त वसाहत योजनेद्वारे मोडक्या व कौलारू घराचे रूपांतर पक्क्या घरात होणार होते. लाखनी तालुक्यात आर्थिक वर्ष 2021-22 वर्षांसाठी 388 घरकुले मंजूर झाले. मात्र आजपर्यंत निधीचे वाटप झाले नाही, अशी माहिती मणिराम नान्हे, अखिल धिवर समाज संघटना, लाखनी यांनी दिली.
ग्रामीण भागात आता घर बांधणे कठीण झाले असल्याने कोणत्याही परिस्थितीत ग्रामीण भागात निधी वाढवून द्यावा, अशी मागणी लाभार्थीनी केली आहे.