अमरावती (Amravati) : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदऱ्याचे महत्त्व आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढविण्यास पूरक अशा भारतातील पहिल्या स्कायवॉकचे काम मागील पाच वर्षांपासून रखडले आहे. पर्यटक या स्कायवॉकच्या प्रतीक्षेत आहेत.
अमरावती-परतवाडा-इंदूर हा आंतरराज्य महामार्ग. 1875 ते 1880 च्या दरम्यानचा हा ब्रिटिशकालीन महामार्ग. या रस्त्याचे आयुष्य संपले, वाहतूक वाढली. 2015 ला दुपदरीकरणासह दर्जावाढ आणि राष्ट्रीय महामार्गाकरिता हा मार्ग प्रस्तावित केला गेला. महामार्ग प्राधिकरणाकडून याबाबत सर्वेक्षण पूर्ण करून विकास आराखडा मंजूर केला, पण पुढे हा प्रस्ताव मागे पडला.
2018 मध्ये हा मार्ग एशियन डेव्हलपमेंट बँकेकडे दिला. पुढे अमरावती-परतवाडा या 54 किलोमीटर लांबीच्या प्रमुख राज्य महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचे ठरले. मार्गाचा डीपीआर तयार असतानाही 2015 पासून या मार्गाचे चौपदरीकरण, दुपदरीकरण, मजबूतीकरण झाले नाही.
मेळघाटातील ब्रिटिशकालीन 118 पुलांपैकी 20 पूल धोकादायक आहेत. यात चार नवीन पूलांच्या निर्मितीसह 16 पुलांची दुरुस्ती अत्यावश्यक असूनही धोकादायक, पूल दुर्लक्षित आहेत. ब्रिटिशकालीन जिल्ह्याचे ठिकाण अचलपूर, येथे एसटी बसस्थानकच नाही.
तसेच, ऐतिहासिक परकोटासह दरवाजे, हौज कटोरा या वास्तूला पुरातत्त्व विभागाने पुरातत्त्वीय ऐतिहासिक वास्तूंचा दर्जा बहाल केला. राष्ट्रीय महत्त्वाचे संरक्षित स्मारक घोषित केले. गाविलगड किल्ल्यालाही संरक्षित स्मारकाचा दर्जा दिला. पण, या प्राचीन वास्तू पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून आजही दुर्लक्षित आहेत.