Amravati : 'हे' कंत्राटी कर्मचारी का करताहेत आंदोलन?
अमरावती (Amravati) : शासकीय सेवेत समायोजनाच्या मागणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बुधवारपासून जिल्हा परिषदेसमोर सुरू असलेला बेमुदत संप दुसऱ्या दिवशीही सुरूच होता. या संपामुळे आरोग्य यंत्रणा पांगळी झाली असून, अनेक आरोग्य सेवा प्रभावित झाल्या आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय येथील शस्त्रक्रिया तसेच डोळ्यांच्या शस्त्रक्रियांना ही ब्रेक लागला आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मागील 15 वर्षांपासून आरोग्य विभागामध्ये अनेक डॉक्टर, परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधनिर्माण अधिकारी, वैद्यकीय अधिकारी तसचे अतांत्रिक अधिकारी व कर्मचारी तुटपुंज्या मानधनावर सेवा देत असल्याचे कृती समितीचे म्हणणे आहे. 20 मार्च 2023 रोजी सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या दालनामध्ये कृती समितीच्या झालेल्या बैठकीमध्ये सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याचे आश्वासन दिल्याचे कृती समितीचे म्हणणे आहे. त्यामुळे याच मागणीसाठी राज्यभरात - एनएचएम अंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला. जिल्ह्यातही जवळपास 1353 अधिकारी, कर्मचारी हे संपात सहभागी आहेत.
जिल्हा सामान्य रुग्णालयांतर्गत येणाऱ्या रुग्णालयांतील जवळपास 292 पैकी 257 अधिकारी, कर्मचारी हे संपात आहेत. त्यामुळे रुग्णालयांतील डोळ्यांच्या शस्त्रक्रिया तसेच इतर शस्त्रक्रियाही थांबविण्यात आल्या आहेत. परंतु, ज्या शस्त्रक्रिया इमर्जन्सी आहेत, त्याला प्राधान्य देण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे यांनी दिली.
इर्विन मधील शस्त्रक्रिया थांबल्या
कंत्राटी संपामध्ये परिचारिका सहभागी असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयातील शस्त्रक्रिया तसेच डोळ्यांच्या शस्त्रक्रियाही थांबल्या आहेत. तातडीच्या शस्त्रक्रियांना प्राधान्य देण्यात येत असल्याचे प्रशासनाने सांगितले.
एसएनसीयूमधील परिचारिकाही संपात सहभागी
कमी वजनाच्या किंवा कमी दिवसांच्या नवजात शिशूंना उपचारासाठी एसएनसीयू विभागामध्ये ठेवले जाते. जिल्ह्यात अमरावती, धारणी आणि अचलपूर येथे एसएनसीयू विभाग असून, येथे काम करणाऱ्या परिचारिका या संपात सहभागी असल्याने आरोग्य प्रशासनाला इतर परिचारिकांची नियुक्ती या विभागात करावी लागली असून कामाचा ताण वाढला आहे.
246 सीएचओ संपात सहभागी
जिल्हा प्राथमिक आरोग्य विभागांतर्गत काम करणारे जिल्ह्यातील 243 कंत्राटी सामुदायिक आरोग्य अधिकारी, राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रम तसेच आयुष अंतर्गत डॉक्टरही या संपामध्ये सहभागी झाल्याने ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणाही कोलमडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.