Amravati News अमरावती : अमरावती महापालिकेने मनपा क्षेत्रातील मालमत्तेचे कर योग्य मुल्य निश्चित करण्यासाठी व कर विभागाचे संगणकीकरण करण्यासाठी बोगस टेंडर (Tender Scam) प्रक्रिया राबवून स्थापत्य कंपनीला 38 कोटींचा ठेका (Contract) देण्यात आल्याचा आरोप अमरावती नागरिक कृती समितीने पत्रकार परिषदेत केला.
अमरावती शहरातील मॉल व मोठ्या मालमत्तेमध्ये, कर अधिक्षक व स्थापत्य कंपनी मांडवली करीत आहे. तसेच वाटाघाटी करून स्थापत्य कंपनीला अधिक फायदा व मदत करण्याकरीता एका मालमत्तेचे पाच किंवा पन्नास मालमत्ता विभाजन करून, मालमत्ता आकारण्यात येत आहे. या वाढीव मालमत्ता कराविरोधात मनपा आयुक्तांच्या निवासस्थानावर कचरा फेको आंदोलन करणार असल्याचा इशारा अमरावती नागरिक कृती समितीने दिला आहे.
अमरावती महानगपालिकेच्या प्रशासकीय कार्यकाळामध्ये तत्कालीन मनपा आयुक्त व कर अधिक्षक यांनी 27 जुलै 2022 रोजी अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्तेचे कर योग्य मुल्य निश्चित करण्याकरीता व अपेक्षित भाडे वाढ करण्याकरीता 13 जून 2022 रोजी प्रशासकीय ठराव केला. त्यानुसार मनपा क्षेत्रामधील व अकृषक खुले भुखंडाचे सर्वेक्षण व करनिर्धारण करण्याकरीता व मालमत्तेचे कर विभागाचे संगणीकरण करणे (Sowftware) खरेदी करणे करीता बोगस टेंडर प्रक्रिया राबवून स्थापत्य कंपनीच्या संचालकाद्वारा हा ठेका देण्यात आलेला आहे.
तसेच या टेंडरमध्ये स्थापत्य कंपनीच्या संचालकाच्या मर्जीनुसार अटी शर्ती टेंडरमध्ये टाकण्यात आल्या. इतर 3 कंपन्यांचे दर कमी असतांना त्यांना अपात्र घोषित करुन स्थापत्य कंपनीला सुमारे 38 कोटीमध्ये टेंडर देण्यात आले आहे. या टेंडरमध्ये प्रत्येक मालमत्तेचा 775 रुपये दराप्रमाणे करारनामा निश्चित करण्यात आला आहे.
मात्र राज्यात इतर मोठ्या महानगर पालिकेमध्ये स्थापत्य कंपनी 385 रुपये दराने काम करीत आहे. तसेच इतर महानगर पालिकेला स्थापत्य कंपनीने मालमत्ते कराबाबतचे सॉफ्टवेअर 10 लाख रुपयाला दिलेले आहे. परंतु, अमरावती महानगर पालिकेला हेच सॉफ्टवेअर 1 कोटीमध्ये देण्यात आलेले आहे.
अमरावती मनपाचे आयुक्त देविदास पवार, कर अधीक्षक देशमुख हे स्थापत्य कंपनीच्या आर्थिक फायदा करीता एकाच मालकाचे संपतीला 4 किंवा त्यापेक्षा अधिक मालमत्ता कराची आकारणी करुन मालमत्ता धारकांची फसवणूक करीत आहेत.
मनपा अमरावती महानगर पालिकेचे आयुक्त व कर अधिक्षक तसेच आरोग्य अधिकारी यांनी वाढीव मालमत्ता कर रद्द करावा तसेच दैनंदिन झोन निहाय साफसफाई ठेक्यात होत असलेली अनियमितता व भ्रष्टाचारामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे. अमरावती महानगर पालिका क्षेत्रामधील मालमत्ता धारका कडून 610 रुपये व आता 710 रुपये असे कोट्यावधी रुपये वसूल करतात. परंतु शहरामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये चौकामध्ये रस्त्याच्या कडेला सर्व बाजूंनी कचऱ्याचे ढिग दिसून येत आहेत. दैनंदिन साफसफाई, कचरा गाडीबाबतची व्यवस्था डबघाईस आलेली आहे.
मनपा आयुक्तांनी दोन्ही गंभीर प्रकरणाची दखल घेतली नाही तर 2 जून 2024 रोजी मनपा आयुक्तांच्या निवासस्थानी कचरा फेकून निषेध नोंदवावा, यात शहरातील प्रत्येक जागृत मालमत्ताधारकराने सहभागी व्हावे असे आवाहन अमरावती नागरिक कृती समितीच्यावतीने करण्यात आले आहे.