Amravati News : 17 जिल्ह्यांतील 10 हजार महिलांसाठी सरकारने दिली गुड न्यूज!
Amravati News अमरावती : राज्य सरकारने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात राज्यातील 17 जिल्ह्यांतील 10 हजार महिलांना ई-पिंक रिक्षा दिल्या जाणार आहेत. त्यात अमरावतीचाही समावेश आहे. 10 हजार ई-पिंक रिक्षांपैकी 300 लाभार्थीही अमरावती जिल्ह्यातून निवडले जाणार आहेत. याबाबतचा आदेश सरकारने जारी केला आहे. (Pink Rickshaw, E Rickshaw)
ई-पिंक रिक्षासाठी 10 टक्के रक्कम ही लाभार्थी महिला वा मुलींना उचलावी लागेल, नागरी सहकारी बँका, जिल्हा बँका, राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँकांकडून ई-पिंक रिक्षाच्या किमतीच्या 70 टक्के कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. राज्य शासन 20 टक्के आर्थिक भार उचलणार तर कर्जाची परतफेड ही पुढील पाच वर्षात करण्याची जबाबदारी लाभार्थीची आहे.
महिला व मुलींना सुरक्षित प्रवास करता यावा, नोकरी तसेच रोजगाराच्या जास्त संधी उपलब्ध असलेल्या अमरावतीसह निवडक 17 शहरांत इच्छुक महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसाहाय्य व चालविण्यासाठी इतर सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. इच्छुक महिला ई-पिंक रिक्षासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे अर्ज करावे लागणार आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती :
सदर योजनेअंतर्गत लाभार्थी निवडीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केलेली आहे. यामध्ये समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी राहणार आहेत. तर सदस्य म्हणून परिवहन अधिकारी, उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा समन्वयक, नागरी बालक विकास प्रकल्प अधिकारी व सदस्य सचिव म्हणून संबंधित जिल्हा महिला बालविकास अधिकारी राहणार आहेत.
अशी आहे योजनेच्या लाभार्थीची पात्रता :
योजनेच्या लाभासाठी ऑनलाइन अर्ज, लाभार्थ्यांचे आधार कार्ड व पॅन कार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, वार्षिक उत्पन्न तीन लाखांपेक्षा कमी, बँक खाते पासबूक, मतदार ओळखपत्र, रेशन कार्ड, चालक परवाना रिक्षा ही लाभार्थी महिलाच चालविणार असल्याचे हमीपत्र अर्जदाराचे वय 18 ते 35 वर्षे दरम्यान असणे अनिवार्य आहे.
पुरुषांनी चालविल्यास कारवाई :
ई-पिंक रिक्षा लाभार्थी महिलेकडूनच चालविली जात आहे, याचाबतची तपासणी करण्याची जबाबदारी वाहतूक नियंत्रक पोलिस विभाग आणि परिवहन विभागाची राहणार आहे. ई-पिंक रिक्षा पुरुष चालविताना आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्याची तरतूद केली आहे.